नाशिक : पुण्याच्या उत्तम प्रतिसादानंतर नाशिकच्या तरुण चित्रकार स्नेहल एकबोटे यांच्या 'अनटायटल्ड' चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आज विश्वास ग्रुपचे प्रमुख विश्वास ठाकूर ह्यांच्या हस्ते झाले. दरम्यान या चित्रप्रदर्शनातील बावीस चित्रांमधून रेषांचे विभ्रम दिसतात. चौकटीत न अडकण्याचा आणि बांधीव साचे मोडण्याचा पिंड या चित्रांमधून स्पष्ट होतो. यावेळी स्नेहल म्हणाल्या "बिंदू जोडून रेष बनते. ती लहान, मोठी, सरळ, वक्राकार किंवा तिरकीही असू शकते. रेष ही जोडण्याचं काम करते. समाजात वाढत चाललेल्या तुटकपणावर उपाय म्हणून जोडण्याचे प्रयत्न सामाजिक कार्यातून घडायला हवेत." त्याचबरोबर ही सर्व चित्र कॅनव्हासवर ऍक्रेलिकने रंगवलेली आहेत. सर्व चित्रांमधील एकवाक्यता जपण्यासाठी फ्रेमचा आकार समान ठेवण्यात आला असून यातील प्रत्येक चित्र पाहणाऱ्याला विचार करण्यास भाग पाडतात. हे प्रदर्शन गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे १० मे ते १२ मे सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. दरम्यान यावेळी विनायक रानडे, सदानंद जोशी, हेमा जोशी, अभय ओझरकर, लक्ष्मण सावजी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.