पराभव पदरी पडल्यानंतर कित्येक नेते पुन्हा त्या भागात फिरायचं टाळतात. मतदारांशी संपर्क कमी होतो आणि हळूहळू राजकारण संपूण जातं. पण त्या पराभवाला आपली ताकद बनवली तर काय होऊ शकतं हे स्मृती इराणी यांनी दाखवून दिलंय. एका निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतरही पुन्हा पाच वर्ष त्याठिकाणी सक्रिय राहुन देशातल्या एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षाला हरवण्याची किमया स्मृती इराणी यांनी करुन दाखवलीय. त्यांचं विशेष कौतुक आहे हे यासाठीच.
अमेठी हा काँग्रेसचा गड मानला जातो. 2004 पासून राहुल गांधी इथून विजयी होत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश मानून स्मृती इराणींनी थेट राहुल गांधींनी आव्हान दिलं. तेव्हा राजकारणात नवख्या असलेल्या स्मृती इराणी यांच्यासाठी ही मोठी गोष्ट होती. निकाल काय लागणार हे बहुदा सर्वांनाच माहित होतं. तरही त्यांनी निकरानं झुंज दिली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या कामाचं बक्षीस त्यांना मिळालं. त्या केंद्रात मंत्री झाल्या. पराभव वाट्याला आला तरी त्यांनी अमेठीशी संपर्क तोडला नाही. त्यांनी अनेकदा अमेठीच्या वाऱ्या केल्या. केंद्राच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याचं एक उदाहरण म्हणजे जवळपास 50 हजार लोकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी केलेले व्यक्तिगत प्रयत्न. अमेठी जिंकण्यासाठी योगी आदित्यनाथांपासून ते अमित शाह आणि थेट मोदींनी जी काही मदत करता येईल ती केली.
अमेठीतील विजयानंतर स्मृती इराणी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आपला विजय म्हणजे अमेठीवासीयांसाठी एक नवी पहाट, नवा संकल्प घेऊन उगवल्याचे स्मृती यांनी म्हटलंय. ट्विटमध्ये त्यांनी अमेठीकरांचे आभार मानलेत.