योगीजी बॉलिवूडचे ठीक आहे, उत्तर प्रदेशात महिला सुरक्षेचे काय?
योगीजी हाथरससारखी अनेक प्रकरणे उ.प्रदेशच्या पोटात लुप्त झाली असतील, त्यांना आवाज मिळणार आहे का?महिलांना तुमचे सरकार समान संधी, सुरक्षितता देणार आहे का, दलित समाजावरील अत्याचार थांबणार आहेत का?
एखादे राज्य किती प्रगत आहे ते त्याच्या आर्थिक श्रीमंतीवरुन ठरत नसते. तर त्या राज्यातील सामाजिक परिस्थिती कशी आहे यावर त्या राज्याची प्रगत ठरवता येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आल्याचा दावा केला असला तरी उ.प्रदेशात महिला किती सुरक्षित आहेत या प्रश्नाचे उत्तर मात्र ते आतापर्यंत देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे शेअर मार्केटमधील योगीजींच्या बुलसोबतच्या फोटोबरोबर एका Fearless Girlचा फोटो व्हायरल झाला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मुंबई शेअर बाजारात लखनऊ महापालिकेच्या बॉण्डची नोंदणी करण्यात आली. कोरोना संकटाच्या काळात लखनऊने आत्मनिर्भरतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा शेअर मार्केटमधील बुलसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आले आहे.
पण योगी आदित्यनाथांच्या बुलसोबतच्या या पोजवरुन काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. उत्तर प्रदेशात कोरोना संकटाच्या काळात १ कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्मिती केल्याचा दावा त्यांनी केला. पण उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत योगीजी काहीच बोलत नाहीत. त्यामुळेच योगीजींच्या त्याच बुल सोबतच्या पोजमधील फोटोला आव्हान देणारा एका मुलीचा फोटोही पुन्हा चर्चेत आला आहे. हा फोटो आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये बेफाम बुलसमोर आव्हानात्मक पोजमध्ये उभे राहिलेल्या एका मुलीचा....या मुलीचा हा पुतळा Fearless Girl म्हणून प्रसिद्ध आहे. एकप्रकारे ही मुलगी योगीजींना सवाल करते आहे की योगीची 'बुल'वर कमांड मिळवाल पण उ.प्रदेशात' Girls Fearless' कधी होणार?
शेअर मार्केटमधील 'बुल'चा अर्थ काय?
शेअर मार्केटमध्ये प्रवेशदारावरच बुलचा पुतळा आहे. या बुलचा अर्थ मार्केट जेव्हा तेजीत येते तेव्हा ते बुलसारखे वेगाने वर जाते. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये तेजी आली की त्याला बुलीश मार्केट असे म्हणतात. त्याचबरोबर हा बुल बेफाम झाला तर तो सारे उध्वस्तही करु शकतो असाही अर्थ त्यातून निघतो.
कोण आहे Fearless Girl?
अमेरिकेतील स्टेट स्ट्रीट ग्लोबल एडव्हायजर या अर्थविषयक फर्मने २०१७मध्ये नूयॉर्कमध्ये एका मुलीचा आव्हानात्मक पोजमधील धातूचा पुतळा न्यूयॉर्क शहरात बसवला. कार्पोरेट क्षेत्रात महिलांना हव्या त्या प्रमाणात संधी मिळत नाहीत, महिलांची संख्या अतिशय कमी आहे आणि कंपन्यांच्या व्यवस्थापन मंडळांवर महिला सदस्यांची संख्या वाढावी हा संदेश देण्यासाठी हा पुतळा बनवण्यात आला होता. काही दिवसांनी न्यूयॉर्कच्या महापौरांनी तो पुतळा हटवून न्यूयॉर्क स्टॉक एक्सजेंमधील बुलच्या पुतळ्यासमोर उभा करण्याचा प्रस्ताव दिला. आपल्याला द्यायचा संदेश संबंधित कंपन्यांना जाऊ शकतो असा विचार करत स्टेस स्ट्रीट कंपनीने हा पुतळा त्या बुलसमोर उभा केला. तेव्हापासून स्त्रियांच्या क्षमतेचा आणि कोणतेही आव्हान पेलण्याच्या निर्धाराचे प्रतीक म्हणून ही Fearless Girl प्रसिद्ध आहे.
योगीजी उ.प्रदेशात Fearless Girl कधी?
म्हणूनच योगीजी हाथरससारखी अनेक प्रकरणे उ.प्रदेशच्या पोटात लुप्त झाली असतील, त्यांना आवाज मिळणार आहे का?महिलांना तुमचे सरकार समान संधी, सुरक्षितता देणार आहे का, दलित समाजावरील अत्याचार थांबणार आहेत का? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.