भावनाताईंनी वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयातून कला शाखेची पदवी घेतली, त्यानंतर त्यांनी एम.ए देखील केलं. वडिलांकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यांचे वडील पुंडलिकराव हे शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख होते. महाविद्यालयीन काळात त्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्या यवतमाळ- वाशिम जिल्हा लोकसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार आहेत. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्या खासदार म्हणून 1999 साली प्रथम निवडून आल्या होत्या. त्यांनी चार लोकसभा निवडणूकांमध्ये जांबुवंतराव धोटे, शिवाजीराव मेघे, मनोहर नाईक, हरिभाऊ राठोड, काँग्रेसचे माजी अर्थमंत्री अनंतराव देशमुख, प्रा. जावेद खान आदी दिग्गजांचा पराभव केलेला आहे. एक आक्रमक खासदार म्हणून त्या ओळखल्या जातात.