तिवसा विधानसभा मतदारसंघातील शिराळा येथील रहिवासी संगिता आखरे यांचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संगीता यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यावेळी तिथं एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळं वेळेवर उपचार मिळाला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. आज तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आखरे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं.
''रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग गंभीर नाही असं या प्रकरणावरून दिसतंय. सध्या पावसाळा सुरू असल्याने या काळात डॉक्टरांनी रुग्णालयात, मुख्यालयी हजर रहावे, मेळघाटातील अतिदुर्गम भागात देखील प्रशासनाने दखल घेऊन आरोग्य सेवा मजबूत करावी तर शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात यावे'' अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.