8 मार्च रोजी जगभरात सर्वत मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जातो. या वेळी कर्तुत्ववान महिलांचा गौरव ही करण्यात येतो. ठिकठिकाणी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, महिला दिन म्हणजे काय किंवा महिला दिन का साजरा केला जातो अशा वंचित व उपऱ्या महिलांना आजही बेदखलच ठेवले जाते. देशाला महासत्ता बनवायचे असेल तर या तळागाळातील महिलांना देखील प्रवाहात आणणे गरजेचे आहे. याच उदात्त हेतू ने ‘मिट्टी के रंग’ समूहाने भटके विमुक्त तांड्यावरील महिलांसोबत महिला दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
या कार्यक्रमाला भिलेवाड, गिरोला, कारध वस्तीतील भटक्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महिलांनी पहिल्यांदाच महिला दिन साजरा केला आणि स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी ज्या महिलांनी लढा दिला त्या न्युयॉर्कमधील कामगार महिलांप्रमाणे आपणही आपले हक्क आणि अधिकारासाठी लढू असा निर्धार या भटक्या महिलांनी यावेळी केला. याक्षणी त्या पहिल्यांदाच बोलल्या आणि नाचल्याही. पहिल्यांदाच आम्ही असे मनसोक्त हसतोय आणि जगतोय असे वाटत असल्याची प्रतिक्रिया ही भटक्यांची भिमाताई ठाकरे हिने बोलून दाखवली.
गावकुसाबाहेर माळरानावर या भटक्यांची बिऱ्हाडं आहेत. स्वछता, आरोग्य, शिक्षण हे सर्व या महिलांच्या गावीच नाही. त्यामुळे या प्रसंगी डॉ. राठी यांनी या महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबद्दल माहिती दिली तर दिक्षित मॅडम व खानापूरकर मॅडम यांनी भटक्या महिलांना शिक्षणाची वाट दाखवली. शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही असे सांगितले. आणि त्याचवेळी या सर्व महिलांनी आम्हाला शिकायचं आहे व उद्योगी व्हायचं आहे म्हणुन ठाम निर्धार केला. दांडेकर मॅडम, महिला पोलीस योगिता जांगडे यांनी या भटक्या महिलांना सुरक्षितता, संरक्षण आणि कायद्याविषयी माहिती दिली.
"दुनिया बदल गयी, इंसांन बदल गये, बदले नही कभी ये मिट्टी के रंग" या प्रमाणेच या भटक्या विमुक्तांच्या जागा बदलल्या, पारंपरिक व्यवसाय बदलले, जात बदलली मात्र जसे मिट्टी के रंग बदलत नाही तसेच यांचे प्रश्नही वर्षानुवर्षे बदलले नाही असे प्रतिपादन पत्रकार कविता मोरे- नागापुरे यांनी केले. यावेळी या सर्व भटक्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालय च्या टीमने यासाठी सहकार्य केले. यावेळी महिला व मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स व खण भेट म्हणून देण्यात आली.