लोकसभा निवडणुकांचा पहिला – दुसरा टप्पा पार पडला असून आता पुढील टप्प्यांसाठी जोरदार प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकंदरित निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. पक्ष कोणताही असू दे, रॅलीमधील महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. प्रचारासाठी मैलोनमैल अंतर पायी तुडवणाऱ्या मुली, बायका दिसत आहेत. एवढेच नव्हे तर विजयानंतर जल्लोष करणाऱ्या, फुगडी घालणाऱ्या महिलाही आपण बघूच. मग निवडणुकीत महिलांना उमेदवारी देताना प्रत्येक पक्ष हात का आखडता घेत आहे? हा सवाल निर्माण झाला आहे. ही परिस्थिती केवळ यावेळच्या निवडणुकीची नसून मागील कित्येक निवडणुकांमधील आहे. याविरोधात आवाज उठवण्याची जाणीव आता महिलांमध्ये निर्माण होत आहे.
गेल्या काही वर्षांत महिलांचे रोजगार कमी झाले आहेत. सुरक्षेचा केवळ एकच प्रश्न आहे का. केवळ बचत गट निर्माण करून त्यांचे आर्थिक प्रश्न सुटणार का...? बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी निवडून येणे ही आजची गरज आहे. ही जाणीव करून देण्याचे काम सध्या सद्भावना संघ या संस्थेचा चित्ररथ करीत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जागृत नागरिक मताधिकार अभियानाचा चित्ररथ फिरत आहे.
लोकसभेत, विधानसभेत महिलांना ५० टक्के आरक्षण हवे. राजकीय पक्षांच्या घोषणापत्रांत महिलांचा मुद्दा सगळ्यात शेवटी येतो. ही परिस्थती बदलली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त जागृती झाली पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.