दरवर्षी कोलकत्ता मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे हे पाचवे वर्षे होते. ५ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही विज्ञान परिषद पार पडली. यामध्ये महिला वैज्ञानिक आणि उद्योजीका यांच्यासाठी दोन दिवसीय परिषद घेतली होती. या दरम्यान शेवटच्या दिवशी महाराष्ट्रीयन महिलांचे सादरीकरण आणि चर्चासत्रात दबदबा दिसून आला.
घर आणि संसार सांभाळून जिद्दीने स्वत: बरोबर समाजाची प्रगती साधणाऱ्या महिलांचा या सत्रात समावेश असतो. अकोलाच्या फूड मदर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या ममताबाई यांनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. साधी राहणी आणि शेतीबद्दल असणारे प्रचंड ज्ञान यामुळे या परिषदेत सर्वांचे लक्ष ममताबाई यांच्याकडेच होते. नऊवारी साडी आणि नाकात मराठमोळी नथ घातलेलल्या ममताबाईंनी वर्मी ब्रिकेडचा म्हणजेच गांडूळ खताच्या गोळ्यांचा वापर आणि त्यांचे संशोधन यावर सादरीकरण केले.
जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या समाजसेवीका निरुपमा देशपांडे तसेच शेतीच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या स्मिता घैसा यादेखील उपस्थित होत्या. या परिषदेसाठी संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षीत महिलांनी हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्रातील कर्तबगार महिलांनीही आपण कुठेही कमी नसल्याचं दाखवून दिलं आहे.