तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या कार्यकारिणीतील एकमेव महिला आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे. अमरावती मतदार संघातून भाजपचे आव्हान मोडून काढत लोकसभेत नवनीत राणा यांना यश आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वात बदल केला. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची धुरा कोण सांभाळेल या प्रश्नाला अखेर बाळासाहेब थोरात यांच्या नावाने विराम मिळाला.
बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याबरोबर काँग्रेसला राज्यात अधिक भक्कम करण्यासाठी पाच कार्याध्यक्षांचीही निवड केली आहे.यामध्ये यशोमती ठाकूर नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी अध्यक्ष व कार्याध्यक्षांनी पदभार स्वीकारला. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यकर्ता मेळावा घेऊन काँग्रेसने शक्तिप्रदर्शन केले. या वेळी राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विधिमंडळ पक्षाचे नेते के. सी. पाडवी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसिम खान आदी नेत्यांची भाषणे झाली.