सावधानतेचा इशारा

Update: 2019-10-01 07:49 GMT

एका बॉयने तुझा पिक अपलोड केलाय....असा एक मेसेज फेसबुकवरच्या कोणत्याही मित्र - मैत्रिणीच्या (शक्यतो मैत्रिणीच्या) मेसेंजरवरुन येतो...आणि त्याला जर का रिप्लाय केला, तर आपलं अकाऊंट हॅक होऊन त्याचा अनेक प्रकारे गैरवापर होण्याची शक्यता आहे. हे मागच्या वेळी साधारण सहा महिन्यांपुर्वी माझ्यासोबत आणि माझ्या लिस्टमधल्या अनेकींबरोबर घडलेलं.. तसं आता पुन्हा होतंय.. आजपासून.. आज मला दोनदा असे मेसेज आले. माझ्या एका मैत्रिणीच्या मेसेंजरवरुन... वाक्य टाईप केल्याची स्टाईल बघून मला वाटलंच, की ती असं काही लिहू शकत नाही. म्हणून फोन करुन खात्री केली, तर खरंच तिने मला मेसेज पाठवला नव्हता. म्हणजेच तिचं अकाऊंट ज्या कोणी भुक्कडने हॅक केलं होत , त्याने तो मेसेज पाठवला होता...

पुर्वानुभवामुळे मी इनबॉक्सला काहीच रिप्लाय केला नाही, तर पुन्हा थोड्या वेळाने मेसेज आला... पण पुन्हाही मी तो मेसेज उघडायची तसदीच घेतली नाही. मागच्या वेळेस माझं अकाऊंट हॅक झालं होतं, तेव्हा तर त्या हॅकरने माझ्या नावे, मी अडचणीत असल्याचं सांगून, माझ्या फेसबुक फ्रेंड्सकडून पैसेही मागितले होते. हे वेळीच लक्षात आल्यानं मी त्याबद्दल पोस्ट टाकून मी अडचणीत नाही... मला कसलेही पैसे नकोत.. माझं अकाऊंट हॅक झालंय.. असं सांगितलं.. पटकन पासवर्ड चेंज करुन अकाऊंट सिक्यूअर केलं. आताही असं साखळीने अनेकींसोबत होत आहे. मुलींचीच अकाऊंट्स हॅक करण्याचा एक विशिष्ट पॅटर्न यात आहे.. कारण मुली टेकसॅवी नसतात, त्यांच्या नावे पैसे उकळणं सोपं वगेरे विचार असावा. पण अशा भुक्कड हॅकर्सचे मनसुबे उधळून लावा पोरींनो..आपल्या फोटोचा खरंच कुणी गैरवापर करत असेल आणि ते दिसलं तर आपले जवळचे मित्र - मैत्रिणी निवांत मेसेंजरवर मेसेज करणार नाहीत.. तर थेट फोन करतील आपल्याला.. किंवा त्याठिकाणी मेंशन करतील.. हे लक्षात घेऊन या ट्रॅपमध्ये फसू नका.. ज्यांचं अकाऊंट ऑलरेडी हॅक झालंय, त्या मैत्रिणींनी सायबर सेलकडे ऑनलाईन तरी तक्रार करुन अशा लोकांना चांगला बांबू लावा..

प्रियंका तुपे पत्रकार

Similar News