हिंगणघाट जळीतकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, ‘हे’ दिग्गज वकील लढणार केस
हिंगणघाट, औरंगाबाद, मीरारोड येथील महिला अत्याचारांच्या घटनेनं महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या दोन दिवसात तीन महिलांना जीवंत जाळल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील शिक्षिकेला जाळल्याच्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: हिंगणघाट येथे जाऊन जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या पालकांची भेट घेतली आहे.
यावेळी नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील केसवानी देखील त्यांच्या सोबत होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी डॉक्टर केसवानी यांच्यासोबत रुग्णालयात जाऊन तरुणीच्या डॉक्टरशी चर्चा केली. साधारण पाऊन तास अनिल देशमुख आणि डॉ. केसवानी या रुग्णालयात होते. पीडितेची प्रकती चिंताजनक असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे.
सध्या तरुणीवर योग्य उपचार सुरु असून तरुणीला कुठंही हलवण्याची गरज नसल्याची माहिती डॉ. केसवाणी यांनी माध्यमांना दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने पीडित तरुणीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. हा खटला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.