आंध्र प्रदेशात गुरूवारी सकाळी एका कारखान्यात विषारी गॅसची गळती झाल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जणांना या विषारी वायूची बाधा झाली आहे. विशाखापट्टनममधील आर आर वेकंटपुरम गावातील एका LG प़ॉलिमर इंडस्ट्रीमध्ये विषारी गॅस गळती झाली.
यानंतर लोकांना त्रास होऊ लागला. यात ८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तर १२० जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सकाळी जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा ८०० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर काहींना बरे वाटल्याने सोडून देण्यात आले आहे.
गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून या विषारी वायू गळतीचा त्रास होऊ नये, यासाठी भरपूर पाणी प्यावे असं आवाहन डीजीपी दामोदर गौतम सावंग यांनी केले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कंपनीवर कारवाई करण्याचा इशाराही आंध्र प्रदेशचे उद्योगमंत्री एमजी रेड्डी यांनी दिला आहे.