आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात महिलांना न्याय देणारं काँग्रेसचं सरकार स्थापन करावं असं आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केलं आहे.
काँग्रेसच्या मुख्यालयात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीसाठी भरपावसातही महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
येणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष महिलांना सर्वाधिक प्रतिनिधित्व देणार असून महिलांनी तळागळातील लोकांशी संपर्क वाढवावा. तसेच महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस सक्षमपणे काम करीत असून, महिलांचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे चारुलता टोकस यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले. तसेच परंपरागत पद्धतीने उमेदवारी न देता भविष्यात थेट जनतेशी संपर्क असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जावी आणि महिलांनी गांभिर्याने तळागाळापर्यंत संपर्क वाढवावा, असे ममता भूपेश म्हणाल्या.