Fact Check: अवकाशातून दिवे लागलेला भारत खरचं असा दिसतो?

Update: 2020-04-06 16:30 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत आज देशभरातील जनतेनं घरोघरी लाईट बंद करून दिवे लावले. अनेक राजकीय नेते, सेलेब्रिटीही या आवाहनात सहभागी झाले.

९ मिनिटे दिवा लावण्याच्या या उपक्रमानंतर अपेक्षेप्रमाणे सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. दिव्याशी संबंधित पोस्ट्स, फोटो, व्हिडीओनी सोशल मीडिया ओसंडून वाहू लागला. अवकाशातून दिवे लागलेला भारत कसा दिसतो हे सांगणारे फोटो सर्वात जास्त व्हायरल होते. हे फोटो नासाने आपल्या सॅटेलाईटमधून काढलेत असा दावाही करण्यात येतोय.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10223010267590924&set=a.4951560072595&type=3&theater

Courtesy : Social media

तथ्य पडताळणी :

सर्वात आधी तर नासाने रविवारच्या उपक्रमानंतर कोणताही फोटो प्रसिद्ध केलेला नाही. सध्या जे काही फोटो व्हायरल होत आहेत ते सर्व जुने आहेत. यातील अनेक फोटो हे देशातील दिवाळीचे फोटो म्हणून याआधी व्हायरल झालेले आहेत.

अनेक वर्षांपासून नासाच्या नावाने हे फोटोज व्हायरल होत असल्याने नासाने यावर आधीच स्पष्टीकरण दिलंय. नासाने स्पष्ट केलं की, दिवाळीच्या वेळी तयार होणारा कोणताही अतिरिक्त प्रकाश (उदा. दिवे, फटाके) इतका सूक्ष्म असतो की, तो अवकाशातून दिसू शकत नाही. त्यामुळे असा फोटो घेणं शक्य नाही.

१२ नोव्हेंबर २०१५ मध्ये नासाने एक फोटो ट्विट करून हा फोटो खोटा असल्याचं म्हटलंय.

हा आहे दिवाळीचा खरा फोटो

Courtesy : Social Media

२०१२ साली नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी Soumi NPP या सॅटेलाईटवरील Visible Infrared Imaging Radiometer Suite (VIIRS) या सिस्टिमने अवकाशातून दक्षिण आशियातील भागांचा फोटो घेतला. या सिस्टमच्या ‘डे-नाईट बँड’च्या आधारावर डेटा गोळा करण्यात आला. त्यानुसार इमेज तयार झाली. त्यानंतर शहरं ओळखू येण्यासाठी त्या फोटोला उजळवलं गेलं.

या लिंकवर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

https://earthobservatory.nasa.gov/images/79682/south-asian-night-lights

निष्कर्ष :

५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात दिवे लावण्यात आले मात्र नासा किंवा इतर कोणत्या अंतराळ संस्थेने याबाबतचे अधिकृत फोटो प्रसिद्ध केलेले नाहीत. नासाच्या नावाने जे फोटो व्हायरल होत आहेत जुने आणि पूर्णपणे खोटे आहेत.

Similar News