आक्रमक अभ्यासु राजकारणी सुषमा स्वराज

Update: 2019-08-07 07:26 GMT

सुषमा स्वराज...

नावातल्या साधर्म्यापेक्षा तडफदार वक्तृत्व अन स्वच्छ अस्खलित हिंदी मुळे माझ्या शाळकरी वयापासून मला प्रभावित करणाऱ्या व्यक्तीमत्वापैकी एक..! पण त्या मांडत राहिलेल्या राजकीय विचारधारेशी मात्र मी कधीच जळवून घेऊ शकले नाही किंवा भविष्यात हि त्याची सुतराम शक्यता नाही. पण पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संसदेतील ज्यांची आवर्जून भाषणे ऐकावीशी वाटली त्यात अटलजी, प्रमोद महाजन, बहनजी, मल्लिकार्जुन, अन सुषमा स्वराज..!!

टिपीकल भारतीय पोशाख.. भारदस्त व्यक्तीमत्व.. मुद्देसूद मांडणी... सभागृहात आक्रमक शैली मात्र आक्रस्ताळेपणा नाही.. (हे स्मृती इराणी अन राज्यात पंकजा मुंडेनी शिकून घ्यावं).. भाजपची विचारधारा पटत नसतानाही या लोकसभेत त्या लढणार नाहीत हे वाचून धडाडीच्या महिला राजकारणी ला भाजप किंबहूना मोदी मागे रेटू पाहत आहेत याचा विषाद वाटत होता. मागे त्या विदेश मंत्री असताना एका मुस्लिम महिलेच्या पासपोर्ट वरून मोदी भक्तांनी ज्या गलिच्छ पणाने त्यांना ट्रोल केले ते भाजपाईंची ब्राम्हणी पुरुषसत्ताक मानसिकता दाखवणारे होतं.

आजही ABP News त्यांच्या मृत्युची बातमी दाखवताना जाणीवपूर्वक "मरने से पहले ट्विट कर उन्होंने मोदीजी ३७० पर बधाई दी" हे ज्या पद्धतीने कंठशोष करून सांगत होते त्यावरून मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी भाजप किती तत्पर असते हे पुन्हा एकदा सिध्द झालं.

कालकथीत गोपीनाथ मुंडेंच्या लेकीलाच manipulate करून संघर्ष यात्रा काढून सहानुभूती मिळवणे, कधी अटलजींच्या अस्थीयात्रेचा अक्षरशः फार्स वाटावा ईतकं ओंगळवाणं प्रदर्शन करणं अन आता सुषमाजींच्या शेवटच्या ट्विटला अधोरेखित करणं हे भाजप च्या नैतिक अधःपतनाचा द्योतक आहे.. प्रकरण ट्विट वर थांबलं तरी बरं.. अन्यथा एकेकाळच्या बिनीच्या शिलेदाराला आयुष्याचा उत्तरार्धात अडगळीत टाकणारे मोदी अन त्यांचे भाट यांनी पुन्हा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अजुन एक अस्थीकलश यात्रा मीरवू नये म्हणजे मिळवलं.. सुषमाजी, आक्रमक अभ्यासू..महिला राजकारणी म्हणून भारत आपण भारतीयांच्या कायम स्मरणात रहाल..

..प्रा सुषमा अंधारे

Similar News