निमित्त टेकडीचं – बहरणं मुलांचं!

Update: 2020-02-20 13:19 GMT

घराजवळच्या टेकडीवर आम्ही बिया पेरायला लागलो, त्यातून टेकडीवर काय काय उगवेल माहित नाही, पण माझी मुलं आणि मी यांच्यामधून जे उगवून येईल ते फार समाधानकारक असेल! टेकडीच्या निमित्ताने आई बरोबर दोघा मुलांनी असं एकत्र निसर्गात जाणं, निसर्ग समजून घेणं आणि स्वतः निसर्गातून भरभरून घेताना थोडंसं परतही देणं ही विलक्षण प्रक्रिया आम्ही अनुभवतोय. मुलांपासून सुटका करून घ्यायला बघणारे पालक जेव्हा विविध क्लासेसमध्ये मुलांना अडकवून टाकतात तेव्हा त्यांचा एकमेकांबरोबर घालवायचा वेळ कमी होतो. आई बरोबर असल्यामुळे मनात सुरक्षित भावना बाळगून मुलं जी मनमुराद निसर्ग अनुभवतात ते शिक्षण –शाळा आणि घर यांच्या खूप पलिकडे घेऊन जातं. झाडं ओळखणं, बिया ओळखणं, बिया पेरणं, त्यांची निरीक्षणं करणं हा साधा सोपा पण रोमांचक अनुभव असतो.

थंडीतल्या गुलाबी बहराच्या ग्लीरीसिडिया नावाच्या विदेशी वृक्षांनी अनेक वर्ष सजलेल्या टेकडीवर एक दिवस बऱ्याच झाडांची कत्तल केलेली आढळली. चौकशी केल्यावर समजलं की वनविभागाने विदेशी वृक्ष मुळापासून उखडून देशी वृक्षांची लागवड करायची ठरवलीय. ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह होती. तरीही वड, पिंपळ, कांचन, कदंब, बांबूचं बन अशी एकसुरी लागवड केलेली मनाला पटेना. दहा आणि पंधरा हजार वृक्ष कापून त्याजागी नवे वृक्ष लावण्यासाठी लागणारं मनुष्यबळ, पैसा, मेहनत आणि साधनं यांचा आवाका एकट्या दुकट्या माणसाला अनाकलनीय वाटतो. त्यात आपण करण्याजोगं काही आहे का, हा विचार सतत मनात येत होता.

गंगेसाठी प्राणांची आहुती देणारे प्रोफेसर जी. डी. अग्रवाल सर यांना स्मरून, आपल्या आवाक्यातल्या पर्यावरणाच्या रक्षणार्थ कृती करण्याची शपथ घेऊन, साखळी उपोषणाची एक चळवळ २०१८ मध्ये एका गटाने केली, त्याचा भाग झाल्यामुळे निसर्ग संवर्धनाचे काही नवे पैलू समजू लागले. माझ्याबरोबर आख्खं घर त्यात ओढलं गेलं. झाडं, प्राणी, पक्षी यांच्या फक्त बातम्या वाचून रक्षण होऊ शकत नाही तर प्रत्यक्ष कृती हा रोजच्या आयुष्याचा भाग व्हायला हवा. जंगलं वाढायला वीस-तीस वर्ष लागतात हे माहित होतं. जमिनीचा कस, जैविक वैविध्य, नैसर्गिक परिसंस्था, पाण्याची उपलब्धी, माणसाचा वावर अशा असंख्य गुंतागुंतींवर निसर्ग संवर्धन अवलंबून आहे. निसर्गाचं सौंदर्य हे खूप खोलात जाऊन समजून घ्यायला हवं, तरच आपल्या छोट्याश्या ताकदीने काहीतरी भरीव काम करता येईल.

वृक्ष लागवड केलेल्या पिशव्या टेकडीवर भिरकावून दिल्याचं लक्षात आल्यावर आम्ही पिशव्या गोळा करू लागलो. खरं तर वन विभागाने नेमलेल्या माणसांनी लागवड करून झाल्यावर पिशव्या मोजून परत देणं आणि टेकडी स्वच्छ ठेवणं बंधनकारक आहे. पण अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या त्या गरीब मजुरांना सारखं कामावरून काढून टाकतात, नवे मजूर येतात आणि आधीच्या मजुरांनी टाकलेल्या पिशव्या उचलायला ते नकार देतात. वन विभागाकडे तक्रार नोंदवून त्याचा पाठपुरावा करणे या कानामागून घासाला नकार देऊन आम्ही असं ठरवलं की आपणच या पिशव्या गोळा करू. जमेल तशा कधी पंचवीस, कधी तीस असं करत, तर कधीतरी काही मित्र मैत्रिणींच्या मदतीने चारशे – पाचशे पिशव्या टेकडीवरून खाली आणत, जवळ जवळ दीड हजारांहून जास्त पिशव्या गोळा केल्या. त्या बांधायला सुतळी घेऊन जाऊ लागलो. माझी मुलं ९ आणि १३ वर्षाची आहेत तरी त्यांचा यातला सहभाग अतिशय महत्वाचा आहे. आता आम्हाला अशा पडलेल्या पिशव्या टोचत राहतात आणि त्या साफ करून योग्य ठिकाणी देणं हेही समजू लागलंय. आमच्यासारख्या अगदी सामान्य माणसाला रोजच्या दिवसातला व्यायामासाठी काढलेला तासभर यात वापरता येतो.

दरम्यान ऐन, मोह, आपटा, कांचन, बोरं, बहावा, उंबर, वड, बीजा, चारोळी, हिवर, धावडा, बाभूळ असे काही टेकडीवरचे वृक्ष ओळखायला आम्ही उष:प्रभा पागे यांच्याकडून शिकलो आणि त्यांच्या बिया गोळा करून त्या दुसरीकडे नेऊन टाकण्याचं काम सुरु केलं. दहा हजारांहून जास्त बिया गोळा करून पेरल्या आहेत. रोज आम्ही ४-५ लिटर पाणी घेऊन जाऊन झाडांना घालतो. काही रोपं घरी तयार करून तीही पावसाच्या आधी लावू. एका मैत्रिणीच्या शेतावर आलेली पन्नासेक पिंपळाची रोपं नेऊन लावली. फळांच्या बियाही जमवून टेकडीवर टाकतो. यातून काय उगवेल माहित नाही पण बिया हे काही कीटकांचं अन्न असतं, जमिनीचा कस वाढायला खत म्हणूनही त्याचा वापर होतो या जमेच्या बाजू. थोडीशी झाडंही येऊ लागली आहेत हे पाहून आनंद होतो. पिशव्या उचलणं असो किंवा बिया पेरून झाडं उगवताना बघणं असो, त्यातून आमचं खूप शिक्षण होतं आहे. निसर्गात रमल्यावर निसर्गातले चमत्कार बघून माणूस नम्र होतो, ही मोठीच ठेव मिळाल्याचं समाधान वेगळंच!

घरातला ओला कचरा जमवून तोही टेकडीवर टाकू लागलोय. लिंबाच्या बिया, खराब टोमाटो, कारली आणि इतरही खराब होणाऱ्या भाज्या जमवून बाल्कनीतल्या सगळ्या कुंड्यांमध्ये टाकल्या. त्यातून लिंबाची रोपं आली. कारल्याची वेल आणि टोमाटोची झाडं आली. मोहोरी आणि मूग सुद्धा आले. एकदिवस धाकट्या मुलाला लिंबाच्या पानांवर छोट्या छोट्या आळ्या दिसल्या. फुलपाखरांच्या माहितीच्या पुस्तकातून आणि काही तज्ज्ञ मित्रांच्या मदतीने त्या कॉमन मॉरमॉन या फुलपाखराच्या आळ्या असल्याचं कळलं. आळी कशी खाते, कशी मोठी आणि देखणी होते, कोश कसा करते आणि फुलपाखरू कसं बाहेर येतं हा अद्भुत प्रवास आपल्याच घरी बघणं फार सुंदर होतं. १२-१३ फुलपाखरांचे जन्म असे बघितले. कुठे नीटनेटकं असावं आणि कुठे अजागळ असावं हे निसर्गाकडून शिकावं. बाग फार आखीव रेखीव, एक्झोटिक फुलझाडांनी सजवली तर फुलपाखरं नाही येत. तिथे थोडं दुर्लक्ष, थोडी कमी सफाई, थोडे प्रयोग आणि निसर्गाला स्वतःचं काम करायला दिलेली उसंत ही तत्व महत्वाची.

क्लायमेट क्रायसिस ही मोठी भीती सतावत असताना हतबल होऊन बघत बसण्याऐवजी आपल्या हातातल्या छोट्या छोट्या गोष्टी करत राहण्यात समाधान आहे. या गोष्टी सामान्य माणूस सहज करू शकतो हा अनुभव आहे. हा सगळा बहर असाच वाढत जाईल याची खात्री आहे.

- आभा भागवत

Similar News