कोरोना या महाभयंकर व्हायरसने जैविक महामारीचे भयावह संकट उभे केले आहे. संपूर्ण जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाचा दिवसागणीक वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणा ताकतीने काम करताना दिसत आहेत. हे युद्ध जिंकण्यासाठी अगदी ग्राम पातळीवरील अंगणवाडी सेविका, आशाताई या महीला देखील दारोदारी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत घरातच राहण्याचे आवाहन प्रत्येकाला करत आहेत.
आरोग्य विभाग यंत्रणेतील आशा प्रवर्तक व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्या मदतीने गावांमध्ये सर्वेक्षण करून ताप, खोकला असलेले रुग्ण शोधून त्यांना आरोग्य यंत्रणेच्या निरिक्षणाखाली ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मागील ८ दिवसापासून घरोघरी जाऊन ग्रामिण भागात हा गृह सर्व्हे पुर्ण करण्यात आला आहे.