त्यांच साडी प्रेम...

Update: 2019-07-31 12:13 GMT

जीन्सपासून, लेगीन, मिनिस्कर्टपर्यंत आजचा फॅशन ट्रेन्ड पोहोचला असला तरीही ‘साडी’ हा प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वाचा एक अलवार कोपरा असतो. कपड्यांची फॅशन कुठेही पोहोचली तरीही वॉर्डरोबमध्ये साडीसाठी खास जागा असतेच. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात हिच साडी सध्या टॉप ट्रेन्डमध्ये आहे. #metoo प्रमाणे #saaritweeter आणि #saariswag या हॅशटॅगने सध्या व्टिटरच्या वॉलवर धुमाकूळ घातला आहे.

साडीचा इतिहास भारतामध्ये खूपच जूना आहे. उलट साडी हि भारतामध्ये अधिकच प्रचलित आणि प्रसिध्द आहे. परंपरा आहे असे म्हंटले तरी चालेल. अंगभर घालायाचा एक मोठा कपडा असेच खरेतर वर्णन असलेल्या या साडी नेसण्याचे प्रांतानुसार प्रकार आहेतच परंतु साडीसाठी वापरले जाणारे धागे, त्याच्यावरील नक्षीकाम हेहि प्रांतोप्रांती वेगवेगळे दिसून येते. त्यावरून भारतात त्या- त्या प्रांताची वेगळी ओळख तयार झाली आहे. महाराष्ट्राची नऊवारी, गुजरातमधील गुजराथी तर कोलकातामधील साडी असे नेसण्याचे प्रकार जरी वेगळे असले तरीही साडी नेसलेली महिला अन्य वेशभुषेपेक्षा अधिक ग्रेसफुल दिसते यात दुमत नक्कीच नसेल.

एखादा ट्रेन्ड चालविण्याच्या या सोशल मिडियाच्या काळामध्ये सध्या याच साडीने आपली जादू केली आहे. सोमवारपासून व्टिटरवर #saaritweeter आणि #saariswag नावाने हॅशटॅग सुरू झाला असून विविध क्षेत्रातील महिलांमध्ये आपल्या आवडीची साडी नेसलेले फोटो अपलोड करण्याची चढओढ लागली आहे. विशेष म्हणजे यामध्ये व्टिटरवरील प्रत्येक गटातील महिलाचा समावेश आहे. या साडीफिव्हरमधून चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाºया अभिनेत्रींसोबतच राजकीय क्षेत्रातील महिलाही मागे नाहीत हे विशेष! राजकीय क्षेत्रातील महिलांसाठी साडी हाच अनेकदा नेहमीचा पेहराव असतो. तरीही त्यातही एखादा खास फोटो व्टिटरवर अपलोड करून तो व्हायरल केला जात आहे. त्याला लाईक्स आणि रिव्टिटस्मधून चांगला प्रतिसादही मिळत आहे. ‘अमूल’ ब्रॅन्डनेही ‘सारी दुनिया देख रही है’ अशी टॅगलाईन देऊन खास पोस्टर झळकवले आहे.

एकीकडे #metoo सारख्या ट्रेन्डमुळे काही काळ सोशल मिडियावरील वातावरण गढूळले असताना सध्याच्या #saaritweeter मुळे मात्र हेच वातावरण रंगीबेरंगी झाले असून पावसाळी मोसमात ते अधिकच खुलून गेले आहे.

-अनघा निकम

Similar News