नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालेलं आहे. येत्या 30 मे रोजी त्यांचा शपथविधी होऊ शकतो. त्याआधी केंद्रीय मंत्रीमंडळाची निवड होणार आहे. त्यात कोणकोणत्या महिला खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळते पाहूयात.
या महिला मंत्र्यांवर पुन्हा जबाबदारी
स्मृती इराणी – स्मृती इराणी यांनी गेल्या सरकारमध्येही वेगवेगळ्या खात्याचा कारभार सांभाळलाय. यंदा त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून धूळ चारलीय. त्यामुळं त्याचं केंद्रीय मंत्रीमंडळातलं स्थान पक्क आहे.
निर्मला सीतारमण - संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या निवडणुकीआधी राफेल प्रकरणावरुन चर्चेत होत्या. काँग्रेसनं मोदींबरोबर राफेल प्रकरणात त्यांनाही धारेवर धरलं होतं. विरोधकांच्या टीकेला त्यांनी तितकंच आक्रमक प्रत्युत्तर दिलं. राफेलसोबत अनेक मुद्द्यांवरुन सरकारची बाजू मांडण्यासाठी त्या माध्यमांसमोरही आल्या. त्यामुळं त्यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवली जाऊ शकते.
मनेका गांधी – मनेका गांधी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी मागच्या सरकारमध्येही महिला आणि बालविकास खात्याचा कारभार पाहिलाय. यंदा त्या उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर मतदारसंघातून निवडून आल्यात. त्यांचंही केंद्रीय मंत्रीमंडळातलं स्थान पक्क मानलं जातंय.
हरसिम्रत कौर बादल – एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अकाली दलाच्या खासदार आहेत. त्या पंजापमधल्या भटींडा मतदारसंघातून निवडून आल्यात. त्यांनी गेल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न प्रक्रीया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. यंदा त्या पुन्हा मंत्री होऊ शकतात.
मंत्रीमंडळात दिसू शकतात हे नवे चेहरे
किरण खेर - किरण खेर या चंडीगड मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर दुसऱ्यांदा निवडून आल्यात. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची ठरल्यास त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
प्रीतम मुंडे - भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होतीय. प्रीतम या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यात ओबीसी मतांचं गणित बांधण्यासाठी प्रीतम यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते.
भावना गवळी - एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनंही भाजपकडे वाढीव मंत्रीपदाची मागणी केल्याचं कळतंय. त्यांच्या वाट्याला 2 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं येऊ शकतात. सेनेचे मंत्री होण्याची क्षमता असलेले चार मोठे नेते लोकसभा निवडणूक हरल्यानं त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. यात यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. त्या या मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडून आल्यात. याशिवाय केंद्राच्या विविध समित्यांवरही सदस्य म्हणून त्यानी काम केलंय. त्यामुळं यंदा मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागू शकते.
याशिवाय, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी याआधीच प्रकृतीअत्यवस्थेमुळं निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळं त्यांच्याजागी कोणाला संधी मिळते हे पहाणं महत्वाचंय. भाजपच्या आणखी एक ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांना मात्र, नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार नाही असं दिसतंय. गंगा स्वच्छता हा केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी त्यांची कामगिरी फारशी चांगली राहीलेली नाही. त्यामुळं त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.