बिट्रीज सिगनर या ब्राझिलीयन अभिनेत्री दिग्दर्शिकेचं नाव गेल्या वर्षीपर्यंत जगाला माहित नव्हतं. कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलच्या Cannes Director's Fortnight साठी तिच्या 'लॉस सायलेन्सिऑस (2018) सिनेमाची निवड झाली. त्यानंतर जगानं तिचं दिल खोलकर स्वागत केलं.
ब्राझिल, कोलंबिया आणि पेरु या देशांच्या सीमावर्ती भागातलं अस्वस्थ भवताल, स्थलांतर आणि या सर्व परिस्थितीतली बाप लेकीच्या सुंदर नात्याची ही गोष्ट आहे.
कान्सपर्यंत पोचण्यासाठी बिट्रीज सिगनरला तब्बल सात वर्षे लागली. सिनेमा सुरु असतानाच ती गरोदर झाली. आता तिचं बाळ चार वर्षांचं आहे. कान्सनंतर गेल्या वर्षभरात तिला 'लॉस सायलेन्सिऑस' साठी जगभरातून निमंत्रण आलं. जगभरातल्या प्रभावी महिला दिग्दर्शकांच्या यादीत बिट्रीज पोचली. या सिनेमासाठी तिला जागतिक दर्जाचा मानवी हक्क पुरस्कार ही मिळाला.
जिथं जिथं ती जाते तिथं आपल्या बाळाला घेऊनच. पॅनल डिस्कशन करताना तिचा मुलगा स्टेजवर तिच्यासोबतच असतो. आपल्या सिनेमाबद्दल बोलत असताना ती आपल्या मुलाचे लाड ही पुरवत असते.
बिट्रीज जगभरातल्या मॉडर्न आईंचं प्रतिनिधित्व करते. बाळ पोटात असताना तिनं 'लॉस सायलेन्सिऑस'चं स्वप्न पाहिलं. ते पुर्ण करण्यासाठी ती झटली. त्यामुळं ती म्हणते हा सिनेमा मी आणि माझ्या बाळाचा आहे. त्यामुळं तो नेहमी माझ्यासोबत असतो.
ब्रिटीजचं इंडिया कनेक्शन ही आहे. बॉलीवुड ड्रिम्स (2010) हा तिचा पहिला सिनेमा. बॉलीवुडमध्ये करियर करु पाहणाऱ्या तीन ब्राझिलीयन मैत्रिणींची ही गोष्ट आहे. त्यावेळी ती भारतात आली होती.
इथं अनुराग कश्यप बरोबर तिची मैत्री झाली. 'लॉस सायलेन्सिऑस च्या निर्मितीसाठी तिनं अनुरागला विचारलं होतं. तेव्हा अनुरागकडे पैसा नव्हता. पण त्यानं तिला मदत केली. सिनेमासाठी लागणारी माणसं जोडून दिली. तिचा सिनेमा तयार झाला. जगभरात पोचला. याची परतफेड म्हणून 'लॉस सायलेन्सिऑस'चा एक्सिक्युटीव्ह प्रोड्युसर म्हणून तिनं अनुराग कश्यपचं नाव दिलंय.
लेखक- नरेंद्र बंडबे