आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील पोलीसांची कुटुंब रहातायत मृत्युच्या दारात
मलाड सारखी दुर्घटना पोलीसांच्या कुटुंबासोबत होण्याची शक्यता, प्रशासन मात्र ढिम्म;
पाच दिवसांपुर्वी मुंबईतील मलाड परिसरात चार मजली जुनी इमारत कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यु झाला. मृतांच्या नातेवाइकांना 5-5 लाख नुकसान भरपाई देण्याचं सरकारने जाहिर केलं. आता असाच काहिसा प्रकार वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात घडण्याची शक्यता आहे.
मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाचे आदित्य ठाकरे प्रतिनिधीत्व करतात. याच परिसरात मुंबईला कुठल्याही संकटातून बाहेर काढणारे पोलीस रहातात. मात्र आता याच पोलीसांचा जिव धोक्यात आला आहे. या पोलीसांची मुख्य समस्या आहे ती म्हणजे धोकायदायक इमारतीची. वरळीच्या पोलिस कॅम्प परिसरात 36 नंबरची ही इमारत असून आतमध्ये प्रवेश करताना 10 वेळा विचार करावा लागेल.
ही इमारत 1984 साली उभारली गेली. चार मजल्याच्या या इमारतीमध्ये पोलीसांची 24 कुटुंब राहतात. पावसाळा आला की इमातीच्या भिंतीतून पाणी झिरपून घरात येतं. रात्री अपरात्री पाऊस आला की घरात पाणी साचतं. घरात शिरणारं पाणी बाहेर काढता काढता सकाळ होते. असं इथले रहिवाशी सांगतात. त्यामुळे या 24 कुटुंबाचा जीव टांगणीला लागला आहे.
या इमारतीचा जिना इतका जीर्ण झाला आहे की कधीही तो कोसळेल. प्रत्येक मजल्यावर जिन्यावरचं प्लास्टर निघून गेलंय. बाहेर आलेले इमारतीचे गज पुन्हा इमारतीमध्ये ढकलण्यात आले आहेत. प्रत्येक घराचं सिलिंक तुटलेलं आहे. पावसामुळं घराच्या भिंती ओल्या आहेत.
इमारतीला बाहेरून पाहिल्यावर असं वाटतं की, ही इमारत एखाद्या पडीक बांधकामाचा भाग आहे. इमारतीला मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. तळमजल्या पासून ते चौथ्या मजल्यापर्यंत या भेगा गेल्याचं दिसतं आहे. इमारतीच्या पिलरमधून गंजलेले गज बाहेर आले आहेत.
इमारती विषयी वारंवार तक्रारी करुन देखील प्रशासन दुर्लक्ष्य करत आहे. त्यामुळे आता मंत्री आदित्य ठाकरे आपल्या मतदार संघातील पोलींसांची ही समस्या सोडवणार का पहाणं महत्वाचं ठरणार आहे.