मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील महत्वाचे महिला नेतृत्व म्हणून शैला गोडसे यांना ओळखले जाते. सध्या त्या कुरूल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी गोडसे या सातत्याने झटत आहेत. त्यासाठी अनेकवेळेला त्यांनी आंदोलनेही केली आहेत. शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देणे हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असल्याचे त्या सांगतात. पाणी प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या मागे मी उभी असल्याचे त्या आजवर सांगत आल्या आहेत. मागच्याच वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून मंगळवेढा–पंढरपूर विधानसभेच्या मतदार संघातील उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कामास सुरूवात केली.