महाराष्ट्राच्या राज्यसभेतील ७ जागांची मुदत येत्या २६ मार्च रोजी संपणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होणार असून राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील २ जागांवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह माजी मंत्री फौजीया खान यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मजिद मेमन यांचा कार्यकाळही एप्रिलमध्ये पूर्ण होणार असून त्यांच्या जागेवर फौजीया खान (Faujiya Khan) यांना संधी देण्यात आलीय.
महाराष्ट्रातील ७ रिक्त जागांपैकी ४ जागा महाविकासआघाडीच्या आहेत. राज्यसभेत महाराष्ट्रातून काँग्रेस आणि शिवसेना यांची १ जागा तर राष्ट्रवादीच्या २ जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली नावं निश्चित केली आहेत. मात्र, शिवसेना आणि काँग्रेसनं आपल्या राज्यसभेतील उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप केलेली नाही.
भारतीय जनता पार्टीच्या २ रिक्त जागांपैकी एका जागेसाठी रामदास आठवले यांचं नाव निश्चित मानलं जातंय. परंतू दुसऱ्या रिक्त जागेसाठी संजय काकडे परत एकदा प्रयत्नशील असल्याचं कळतंय. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळही संपुष्टात येत असून त्यांच्या जागेवर उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.