सरपंच पदावरून खासदारकीपर्यंत प्रवास करणा-या रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. त्यांना 2019 सालच्या लोकसभा निवडणूकांसाठी भाजपने जळगाव जिल्ह्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून त्या 2014 साली देखील निवडून आल्या होत्या. 16 व्या लोकसभेतील त्या सर्वात युवा संसद सदस्य होत्या. रक्षा यांना ग्रामीण जीवनाची आणि आवश्यक विकासाची उत्तम माहिती आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. 2010 ते 2012 या काळात त्या मुक्ताईनगरच्या सरपंच होत्या. पती निखिल खडसे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या जळगाव जिल्हा परिषदेतील रिक्त जागेवर रक्षा या निवडून आल्या आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलं. 2014 साली महिला सशक्तीकरण समितीच्याही त्या सदस्य होत्या.