अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चक्रीवादळाचा फटका हा रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी बसणार असे हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र आता हे निसर्ग चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनारी येणार असून मुसळधार पाऊस ही पडणार असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
एन डी आर एफचे दोन पथक आले असून अजून दोन पथके दाखल होणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्ह्यात 144 कलम लागू केले असून नागरिकांनी 3 जून रोजी बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/736401057098357/?t=0
एकीकडे कोरोनाचे संकट असताना आता चक्रीवादळाचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सजज झाले आहे. जिल्ह्यात एनडीआरएफचे 22 जणांचे दोन पथक दाखल झाले होते. यापैकी एक अलिबाग तर दुसरी श्रीवर्धन येथे तैनात केली आहे. तर अजून दोन एनडीआरएफ पथक दाखल होणार आहेत. अलिबाग, श्रीवर्धन येथील एनडीआरएफ पथकाने आज समुद्रकिनारी भागात फिरून परिस्थितीची पाहणी केली. तसेच मुरुड कोस्ट गार्ड पथक, रिव्हर राफ्टिंग पथक यांनाही सतर्क करण्यात आले आहे. समुद्र किनारी असलेल्या जीवरक्षक यांनाही सतर्क केले आहेत. अलिबाग समुद्रकिनारी निसर्ग चक्रीवादळ येणार असल्याने अलिबाग तालुक्यात प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
जिल्ह्यातील समुद्र किनारीलगतच्या 62 गावातील 1 लाख 73 हजार नागरिकांना या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. समुद्र किनारी लागत असलेल्या गावातील कच्चे घर असणाऱ्या नागरिकांना शाळा, समाज मंदिर, हॉल याठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची संभावना आहे त्याठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात 3 जून रोजी 144 कलम लागू केले असून नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, आपली वाहने मोकळ्या जागेत लावावीत, घराच्या बाजूला असलेली झाडे तोडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
जिल्ह्यातील उरण, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात समुद्र किनारा असून याठिकाणच्या भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी टॉर्च, कंदील, बॅटरी याची व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. तसेच या आपत्तीत जिल्ह्यातील तरुणांनी पुढे येऊन शासन आणि प्रशासन मदत करण्याचे आवाहनही केले आहे. जिल्ह्यातील 5065 मच्छिमार बोटी ह्या समुद्र किनारी ठेवल्या असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर होमगार्ड, सागरी सुरक्षा बल, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा यांना सतर्क राहण्यास प्रशासनाने सांगितले आहे. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी निगराणी कक्ष तयार करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून ग्रामपंचायत विभागालाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहेत. चक्रीवादळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून 3 जून रोजी नागरिकांनी बाहेर न पडता जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.