ज्या देशात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते आणि मिनिटा मिनिटाला बलात्कार होत असतात, जाळून टाकलं जातं, बहुसंख्य पुरुष बुभुक्षित नजरेने स्त्रियांकडे पाहत असतात, त्या देशात घरात राहणारी आणि घराबाहेर पडणारी प्रत्येक स्त्री ही एक सक्सेस स्टोरी असते. घरातले आणि बाहेरचे पुरुष सोसणं, त्याच व्यवस्थेत घडलेल्या स्त्रियाही सोसणं ही काही सोपी गोष्ट नाहीच. मुळात स्त्री भ्रूण हत्या टाळून जन्माला येणं, हीच एक सक्सेस स्टोरी आहे.
ह्यात सगळेच पुरुष काय असे असतात का, हे कसं जनरलायझेशन केलंय, असे झेंडे घेऊन यायची गरज नाही. केवळ जन्माने पुरुष निपजला म्हणून आपसुखच भरपूर लिबर्टीज स्त्री कडून तुम्ही कळत नकळत उपटलेल्या आहेत. तर, तुम्ही चांगले पुरुष असाल, असं स्वतःला मानत असाल, तर थोडं आणखीन खरवडून बघा स्वतःला.
Success story मधून प्रेरणा मिळू शकते. पण स्वतः काहीच न करता इतरांच्या आयत्या success story वर टाळ्या पिटून तुमच्या आयुष्यातला तुमच्यासाठी काम करण्याचा वेळ वाया जातो. जे कुठल्या शिखरावर जातात, ते खालपासून वर चढतात. आपण फक्त ते वर गेल्यावर टाळ्या वाजवतो. ते खाली, मधल्या कुठल्या टप्प्यांवर असतील, तर दखल सुद्धा घेत नाही. किंबहुना हाच समाज त्यांना त्रासदायक ठरत असतो.
तर, आज सो कॉलड शिखरावर नाहीत, पण त्या वाटेला आहेत अशा अनेक स्त्रिया बाहेरच्या जगात धडपड करत असतात. त्यांना किमान बरे आणि स्वच्छ टॉयलेट्स सार्वजनिक जागी उपलब्ध करून देणं जास्त गरजेचं आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने सुसह्य प्रवास कसा होईल, ते पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ डोंबिवली, मीरा रोड ह्या स्टेशन्सवर सर्व मंत्र्यांनी आपले टॅग बाजूला ठेवून सामान्य नागरिक म्हणून प्रवास करून बघावा गर्दीच्या वेळेत. गर्दीच्या वेळेत एखाद दोन लेडीज स्पेशल लोकल वाढवता आल्या, तर आज यशाच्या वाटेवर असलेल्या अनेक स्त्रिया जरा सुसह्य प्रवास करू शकतील.
तेजस्विनी ही लेडीज स्पेशल बस सेवा दोन तीन महिन्यांपूर्वी मुंबईत सुरू झाली. त्यात स्त्रिया कमी, पुरुष जास्त असं चित्र दिसलं. लेडीज स्पेशल बस काढली, तर ती कोणत्या रुट्सला, कोणत्या वेळी चालवावी जेणेकरून स्त्रियांना तिचा जास्त लाभ होईल, ह्याचा काही अभ्यास केला की नाही? मग प्रतिसाद मिळत नाही म्हणत ती सर्वांना खुली करायची! म्हणजे, सामान्य स्त्रीला, जी धक्के खात प्रवास करते, काहीच फायदा नाही ह्या बसचा. पण कागदावर काय? सरकारने लेडीज स्पेशल बस सेवा दिलीये!
तर, महिला दिनाला मोठाल्या गप्पा झोडण्यापेक्षा किमान डोंबिवली आणि मीरा रोड स्टेशन्सला होणाऱ्या गर्दीचा अभ्यास करा. तिथल्या स्त्रिया आणि पुरुष सर्वांनाच बरा प्रवास करायला काय सोय देता येईल, ते बघा. तेजस्विनी बसेसचे रूट्स आणि वेळा तपासून बघा. जेणेकरून जास्तीत जास्त महिला ह्या महिला स्पेशल बसने जातील.
-प्राची पाठक