समाजात वाढणारे महिलांवरील अत्याचार तसेच मुलींचा होणारा लैंगिक छळ या घटनांवर कुठेतरी जरब बसण्यासाठी तसेच यावर कायदेविषयक प्रबोधन करण्यासाठी पुण्यात महावीर जैन विद्यालय येथे ज्येष्ठ विधिज्ञ रमा सरोदे यांनी आज कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत औरंगाबाद , नागपुर तसेच पुण्यातील विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच नागरिकांनीही सहभाग घेतला होता.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे, सामाजिक कार्यकर्ते युवराज शाह, दिलीप धर्माधिकारी उपस्थित होते.
महिलांवरील हिंसा समजूण घेण्यासाठी हिंसेची प्रक्रिया, पुरूषप्रधानता, अन्यायबाधक व्यक्तीस समजून घेणे आवश्यक ठरते. संवेदनशीलता असेल तरच हिंसाचाराचे स्वरूप स्पष्ट होते. केवळ कायद्याने प्रश्न सुटत नाही तर कायद्याच्या संवेदनशील अंमलबजावणीच्या परिणामाने प्रश्न सोडविता येतील असे मत ऍड. रमा सरोदे यांनी व्यक्त केले.
कौटुंबिक हिंसा, सुरक्षित कार्यस्थळे तसेच स्त्रियांवरील आक्रमणे संदर्भातील कार्यशाळेत बोलताना अशोक धिवरे यांनी समाजभिमुख वकील निर्माण होण ही काळाची गरज आहे तसेच कायद्याचे सोप्या भाषेत विश्लेषण समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे वकील निर्माण व्हावेत असे सांगितले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ऍड. परिक्रमा खोत यांनी केले तर मदन कुऱ्हे यांनी आभार प्रदर्शन केले.