करमाळयात समाजकल्याणच्या होस्टेलला राहायचो अन् महात्मा गांधी शाळेत शिकायला जायचो. शाळेची बिल्डिंग भव्य, पण आम्ही खेड्यातून आलेलो... लेट ऍडमिशन... दहावी 'फ'... तिकडं पत्र्याच्या खोल्यात फक्त मुलांचा वर्ग. दहावीला असताना गणितात पास होणं अवघड वाटायचं. शिक्षक मात्र सर्व भारी होते, प्रत्येकाला समजून घेणारे व सायकलवर शाळेत येणारे वर्गशिक्षक पवार सर.. एका झपाट्यात गाल लाल करणारे पण शिकवण्याची स्वतंत्र पद्धत असणारे व समजे पर्यंत शिकवणारे 'रानगट' सर.. हिंदी शिकवताना मंत्रमुग्ध होणारे सर्जेराव विधाते सर..! मस्त हॉस्टेल लाईफ.. जमेल तेवढाच अभ्यास, रूमवर मनसोक्त झोपा काढणे.. भरपूर अवांतर वाचन... सायकलवर सगळ्या करमाळयात हिंडणे.. सागर अन शिवकृपाचे 'शो' न चुकता अटेंड करणे असं मजेत शैक्षणिक वर्ष संपलं, परीक्षा झाली..
तर मुख्य मुद्दा हा की तेव्हा दहावीचा निकाल हे असं ऑनलाईन बिनलाईन काही नव्हतं.
आमच्या शाळेची एक पद्धत होती. निकाला दिवशी निकालाची वाट पाहणारे सर्व विद्यार्थी, पालक शाळेच्या भव्य क्रीडांगणावर जमलेले असायचे व दुपारी 3 - 4 वाजता च्या सुमारास पास झालेल्या सर्वांची नावं स्पीकर वरून सांगितली जायची. ज्याचं नाव स्पीकर वरून सांगितलं नाही त्यांनी गप खाली मान घालून घरी सटकायचं. असा सायलेंट अपमान केला जायचा. पण त्या गर्दीतून गपचूप बाहेर निघणं ही सोपं नसायचं. आणिक नाव राहिली असतील , त्यात आपण असेल अशी आशा पोरांना असायची.
निकाला दिवशी आम्ही शाळेच्या त्या ग्राउंड वर पोचलो स्पिकरवर एक एक नावं चालू झाली. धडधड वाढू लागली. आमची तुकडी सुरू झाली... वीसेक मित्रांची नावं आली.. आता तर बीपी वाढायला लागला असेल अन् तेवढ्यात आपलं नाव कानी पडावं अन् आपण जागेवर जोरात ओरडत उंच उडी मारून मित्राला थेट मिठी मारावी... अन् तिथून मित्रांना घेऊन थेट शाळेमागच्या भेळ सेंटरवर जाऊन, 'पास झालो..' म्हणत भेळ अन् थमसप ची पार्टी झोडणे.. अशी उत्सुकता तानणारा कोणताच शैक्षणिक निकाल पुन्हा आयुष्यात अनुभवता आला नाही.
आता दहावीची पोरं अन् त्यांचा निकाल हे सर्व पाहून हे जुने दिवस आठवले.
(जगदीश ओहोळ, हे शिक्षक आहेत. त्यांनी वरील पोस्ट आपल्या फेसबुकवर लिहिली आहे.)