राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना लॉकडाऊनचे नियम डावलून वाधवान (Wadhwan) यांच्या कंटुंबाला महाबळेश्वर येथे पोहोचण्यासाठी विशेष पत्र देण्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अमिताभ गुप्ता यांचं वाधवान कुटुंबाला पत्र देणं हा केंद्र सरकारचा डाव असल्याची शंका व्यक्त केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे मरकज प्रकरणी अजित डोवाल (Ajit Doval) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना प्रश्न विचारणारे पत्र प्रसिद्ध होते. त्याच दिवशी गृह विभागाचे विशेष प्रधानसचिव अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) हे वाधवान कुटुंबाला स्पेशल पत्र देतात. यावरुन केंद्रातील निजामुद्दीन मरकज प्रकरण दाबण्यासाठी ही केंद्र सरकारची खेळी असल्याची अशी शंका रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मरकज प्रकरणी अजित डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारणारे पत्र प्रसिद्ध होते.त्याच दिवशी गृह विभागाचे विशेष प्रधानसचिव अमिताभ गुप्ता हे वाधवाण कुटुंबाला स्पेशल पत्र देतात.@OfficeofUThttps://t.co/in3ETIpC6y
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 10, 2020
या ट्वीटमध्ये त्यांनी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांचा आधार घेताना ही चाकणकर यांनी शंका उपस्थित केलीय. सचिन सावंत काय म्हणाले आहेत.
- वाधवान ग्रुप हा भाजपाचा प्रमुख देणगीदार राहिला आहे, त्याच्या बदल्यात भाजपाने वेळोवेळी वाधवानची मदत केलेली आहे.
- वाधवान कुटुंबातील २३ जणांच्या महाबळेश्वर पर्यटनासाठी पत्रप्रपंच करणारे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती ही फडणवीस सरकारनेच केलेली आहे.
- महाबळेश्वरला जाण्यासाठी जे पत्र देण्यात आले त्यामागे भाजपाच्याच बड्या नेत्याने ‘शब्द टाकला’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवार यांनी अजित डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर कोणते प्रश्न उपस्थित केले?
- मुंबईजवळील वसईतही १५ आणि १६ मार्च रोजी ५० हजार तब्लीगी एकत्र येणार होते पण, महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने त्यांना परवानगी नाकारली. त्यावेळी केंद्रातील गृहमंत्रालयाने निजामुद्दीन,दिल्ली येथे तव्लीगी मरकज मध्ये इज्तेमाचं आयोजन करण्याची परवानगी का दिली ?
- दिल्लीतील तव्लीगी मरकजच्या अगदी बाजूला पोलिस ठाणे आहे त्यांनी या जमावास का रोखले नाही? केद्राचे तसे आदेश होते का?
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रात्री २ वाजता निजामुद्दीन मरकज मध्ये का जातात? हे काम दिल्ली पोलिस आयुक्तांचं नाही का? या दोघांकडूनही याप्रकरणी कोणतच अधिकृत विधान आलेलं नाही.
या प्रकरणात माजी विरेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात मौन सोडून गृहखात्याने जबाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"वाधवान यांना सोडण्याचा कोणाचा आदेश होता, कोणाची विनंती होती, कोणाचा आशीर्वाद होता, कुणामुळे हे पत्र निघालं, याची पूर्ण चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. केंद्रीय एजन्सीजकडून जे लोक फरार होताहेत त्यांना फरार व्हायला जर महाराष्ट्रातील सरकार आणि पोलीस मदत करणार असतील तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहूच शकणार नाही. " असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलंय.