मुंबईतील मरीन ड्राईव्ह स्थानकाजवळ मुंबई महानगर पालिकेने महिलांसाठी 'ती' स्वच्छतागृह सुरू केलं आहे. एका जुन्या बसचं टॉयलेटमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. या स्वच्छतागृहात वायफाय आणि टीव्ही आणि एक डिजीटल फीडबॅक मशीन तसेच पॅनिक बटण, सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सर, सोलार लाइट्स, ब्रेस्टफिडींग स्टेशन अशा सुविधा या ‘ती’ टॉयलेट मध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
मरीन ड्राइव्हचा परिसर हा हेरिटेजमध्ये मोडत असल्यानं येथे पक्क्या टॉयलेटच्या बांधकामासाठी हेरिटेज समितीची परवानगी लागेल. शिवाय येथील महिला पर्यटकांची तसंच प्रवाशी संख्या जास्त असल्यानं, मुंबई महापालिकेने ९ सप्टेंबर रोजी पुण्याची ‘ती’ टॉयलेट बनवणारी कंपनी सारा प्लास्ट इंडिया लिमिटेडशी संपर्क साधला. आणि मुंबईतील पहिले ‘ती’ टॉयलेट साकार झाले.
पालिकेने कंपनी समोर काही अटीही ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ, या टॉयलेटची जागा, पाणी, वीजेची व्यवस्था पालिका करेल. एक वर्षापर्यंत या टॉयलेटचा खर्च पालिका उचलेल. ड्रेनेज लाईनही पालिकेची असेल. तसेच टॉयलेटला ‘पे अँड यूज’ मॉडेलप्रमाणे चालवलं जावं. या शौचालयाचा वापर करण्यासाठी महिलांना ५ रु. शुल्क मोजावे लागणार आहेत.