आई वडिलाचं छत्र गमावलेल्या दोन बहिणींच्या शिक्षणाचा भार उचलणार : यशोमती ठाकूर

Update: 2020-03-01 13:22 GMT

असं म्हणतात शिक्षण म्हणजे वाघीणीचं दूध असतं. ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मात्र, अलिकडे शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाचं गणित सर्वसामान्याच्या आवाक्याच्या पलिकडं गेलं आहे. त्यातच जर कोणाच्या डोक्यावरील आई वडिलाचं छत्र हरपलेलं असेल तर? ह्रदय हेलावून जातं.

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. लहान वयातच आई वडिलाचं छत्र हरपलेल्या पायल रडके हिच्या कारुण्यपूर्ण रुदन ऐकूण त्यांचं मन हेलावून गेलं. त्यांनी तिचा आणि बहिणीचा शिक्षणाचा भार उचलला.

पायल रडके ही मुर्तीजापूर तालुक्यातील इयत्ता तेरावी ची विद्यार्थी. ती अजाण असतानाच 2010 साली तिच्या आईने स्वत:ला जाळून घेतलं. वडिलांनी स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळं तिच्या डोक्यावरुन आई बरोबरच वडिलांचं छत्रही हरपलं. आई गेल्यानंतर तिच्या बहिणीचा आणि तिचा सांभाळ करण्या इतपत कोणत्याही नातेवाईकाकडे पैसा व वेळ नव्हता.

शेवटी नाईलाजाने तिच्या मामाने या दोनही मुलीला घरी आणलं. आत्ताच मी तेरावी पास झाले. मात्र, पैसा नसल्यानं पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. असं म्हणताच तिला रडू कोसळलं... डोळ्यातून वाहणाऱ्या धारा पुसत पायल म्हणाली

‘आता मामा-मामी थकले आहेत. शिवाय मी ही माझ्या पायावर उभी राहू इच्छिते. त्यामुळे मला मदत करा. आई वडिल जेथे राहायचे, तेथे वास्तवाची संधी मिळालीच नाही म्हणून ना माझ्याकडे त्यांच्या मृत्यूचा दाखला आहे ना माझे स्वत:चे जात प्रमाणपत्र. त्यामुळे स्कॉलरशीप ही घेता येत नाही. म्हणून माझ्या व माझ्या लहान बहिणीच्या शिक्षणाची सोय करा.’ अशी विनंती पायल तिच्या बोलण्यातून केली होती.

त्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना तिला जवळ बोलावले. आणि तुला जे शिकायचे आहे ते शिक. मी तुझ्या पाठीशी उभी आहे. असं म्हणत तिला जवळ घेतले. ‘तुझं शिक्षण जिथं करायचं ते कर, तुला जे शिकायचं आहे. ते शिक. तुला इंजिनिअरिंग मेडिकल ज्यात आवड असेल ते शिक्षण घे, फक्त अभ्यास कर. शिस्तीत राहा. मी तुझा पुर्ण खर्च करेन. असं म्हणत तिच्या शिक्षणाचा आणि तिच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च करण्याचं आश्वासन दिलं.

त्याचबरोबर मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आत्महत्या करणाऱ्या कुटुंबांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी समाजातील आदर्श महिलांचे दाखले त्यांच्या समोर मांडले. त्यांना जगण्याची उर्मी दिली.

दरम्यान मंत्री यशोमती ठाकूर यांच्या या निर्णयाने त्यांचं कौतुक केलं जात आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी यशोमती ठाकूर यांच्याप्रमाणे जर समाजाने मदतीचा हात दिला तर पायल सारख्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावं लागणार नाही.

Similar News