#Me Too पर्यंत न पोचू शकणाऱ्या मुली...

Update: 2019-06-14 08:01 GMT

शहरापासून लांब, गावात बसही न येणारं, तीसेक घराचं एक गाव.. कुग्रामच!

या गावात एका कुटुंबात आईवडील आणि दोन मुली. मोठी बारा वर्षाची मुलगी जन्मतः मतिमंद होती. मतिमंदत्वाचं प्रमाण जास्त. तिला बोलता येत नव्हतं.. हिंडू फिरू शकायची. पण सगळं करावं लागायचं. धाकटी बहीण नॉर्मल पण तिला फिट्स येत असत.

घरात जेमतेम शेती. वडील शेतीकडं बघायचे. त्यात पोट भरत नसे. म्हणून तिशीची आई सात आठ किमी वरच्या जरा मोठ्या असलेल्या गावात कामाला जाई. आजी या दोघी आणि दुसऱ्या मुलाची तीन अशी पाच नातवंडं सांभाळत घरी असे.

एके दिवशी आजी काही कामासाठी गावाला गेली. वडिलांकडे मुलीला सोपवून आई लवकर परत यायच्या बोलीवर कामावर गेली. चार वाजता आई घरी आली. वडील पुढचं दार ओढून धाकटीला घेऊन शेतात गेले होते. आई घरात गेली तर मोठी दिसेना. शोधत शोधत आत स्वैपाकघरात गेली तर एका कोपऱ्यात थरथर कापत बसलेली मुलगी दिसली. अंगावर एक कपडा नव्हता. घरात बऱ्याच ठिकाणी रक्त सांडलेलं. आई हबकली. कळेचना काय करावं. मुलीला जवळ घेतलं. कसंबसं शांत केलं. स्वच्छ आंघोळ घातली. रक्त पूर्ण जाईपर्यंत घर स्वच्छ पुसून काढलं.

थोड्या वेळानं वडील आले. त्यांना काहीच माहीत नव्हतं. ते बिचारे थोडा वेळ काम होतं म्हणून शेतात गेले होते. आई वडील खूप चरफडले. पण कुणाचं नाव घेणार? मुलगी काहीच सांगू शकत नव्हती.

आईनं बायकांच्यात आडून आडून चौकशी केल्यावर तिच्या कानावर आलं की चार घरं पलीकडं राहणाऱ्या तरुण मुलाला शरीरसंबंध केल्यावर रक्तस्त्राव होतो. पण ही अडाणी बाई. त्या बऱ्या परिस्थितीतल्या तरुणाला कसं टोकणार! बारीक गाव, जिथं जन्मात कधी पोलीस आले नव्हते. आईवडील गप्पच राहिले.

आमच्या कानावर ही गोष्ट आली तेव्हा महिना होऊन गेला होता. आम्ही खूपदा आईला पोलिसांकडं जायचं सुचवलं, पाठीशी उभ्या राहू असं सांगितलं. पण आईवडिलांना इतर अनेक गरीब लोकांप्रमाणेच पोलिसांचा चांगला अनुभव नव्हता.

आईला मुलीला काही इजा झाली नाही ना हे एवढंच बघायचं होतं. एका संवेदनशील स्त्री डॉक्टरांकडे मुलीला आईवडिलांसोबत मी नेलं.

मुलीला डॉक्टरांच्या तपासणीच्या टेबलवर आडवं केलं. त्या क्षणी त्या मुलीनं जो आकांत केला तो कधीच विसरू शकणार नाही.तिला तिच्या पातळीवर कदाचित त्या वेदना आठवल्या असतील आणि भीती वाटली असेल.

ज्या आईवडिलांना आपल्या मतिमंद मुलीवर अत्याचार झालाय का हे बघण्यासाठी तिला घट्ट पकडून ठेवावं लागतं त्या आईवडिलांच्या वेदनांची मी कल्पनाही करू शकत नव्हते. मला इतकं हताश, हतबल आणि निराश आयुष्यात क्वचितच वाटलंय.

त्या कुग्रामात अजूनही ते कुटुंब तसंच राहातंय. आजी मरून गेली आहे आणि मुलीची आई आता घरबसल्याच काही बाही करत पोट भरते.

रंजना बाजी

Similar News