जागतिक महिला दिन विशेष..
जिजाऊंची कर्तृत्ववान ध्येयवेडी लेक 'मनाली चंद्रकांत जाधव'
भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील सर्वसामान्य कुटूंबामध्ये श्रीमती. भारती चंद्रकांत जाधव यांच्या पोटी ७ मार्च १९९९ रोजी मनाली अर्थात जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकीचा जन्म झाला. जन्मापासून मनालीचे जीवन संघर्षाने भरलेलं राहिलं. मनाली सहा वर्षाची असताना वडिलांचं अपघाती निधन झालं. खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये असतांना मनालीला व तिच्या दोन छोट्या बहिणीना बाबांच्या प्रेमापासून वंचित राहावं लागलं. तेव्हापासून मनाली, ऐश्वर्या, गौरी या तीनही लेकीचा सांभाळ करतांना आई-बाबा या दुहेरी भूमिका मनालीच्या आईने यशस्वीपणे निभावल्या. तर मनालीचे काका विलास जाधव व काकी विशाखा जाधव यांनी सतत तिला प्रोत्साहन दिलं.
अत्यंत खडतर परिस्थितीत स्वतःला सावरून खंबीरपणे आपल्या मुलींचा सांभाळ करून त्यांना मोठं करायचं हेचं स्वप्नं मनालीच्या आईने पाहिलं. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला मनालीने उभं केलं, मनात असलेल्या विलक्षण ध्येयसक्तीने सगळ्या संकटाचा सामना करत मनालीने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण नवसमाज विद्यामंदिर मानिवली येथे पूर्ण केले. शालेय जीवनामध्ये असतांना मनालीने कुस्ती खेळांमध्ये आपलं करिअर करायचं ठरवलं व त्यानुसार अहोरात्र मेहनत करून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
ग्रामीण भागात कुस्ती हा खेळ म्हटलं हा प्रामुख्याने मुलांचा खेळ म्हणून पाहिलं जातं त्यामुळे सर्वाना कुतूहल वाटतं होत की मनालीचे कुस्तीमध्ये काय कमावणार..!! मात्र या सर्वांना बगल देत मनाली एक एक पायरी यशाची चढत राहिली. विविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मनालीने चुणूक दाखवायला सुरवात केली व आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला व स्वतःचं अस्तिव निर्माण केलं. मनालीने कुस्ती या मातीमधील खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मनालीच्या या यशामध्ये विजय बारटे सर, ईश्वर देसले, ऋषिकेश जाधव, ज्ञानेश्वर पाटील, पंकज पवार, दिनेश गुंड व आदी प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे मोलाचं सहकार्य मनालीच्या जडणघडणीमध्ये राहीलं.
आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी सदैव भक्कम आधाराची गरज हवी असते. तोच आधार मनालीला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या रूपाने मिळाला. मनाली व तिच्या आईने केलाला संघर्ष सर्वाना ठाऊक असल्यानें निलेश सांबरे यांनी मनालीला दत्तक घेतले. लहानपणी वडिलांचं छत्र हरपलं मात्र जीवनाच्या महत्वपूर्ण क्षणी निलेश सांबरे हे आधारवड म्हणून धावून आले. मग काय मनालीने मागे वळून पाहिलेच नाही,
२०१९ मध्ये शिर्डी शिर्डी येथील २३ वर्षांखालील सिनिअर नॅशनल कुस्तीस्पर्धेत कांस्य पदक, हरियाणा येथील ज्युनिअर नॅशनल कुस्ती स्पर्धेत रजत पदक, गुजरात येथे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक, तसेच ठाणे जिल्ह्याला सतत ३ वर्ष मुलींच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. अशा विविध स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम ठेवत सर्वाना अभिमान वाटावं अशी उल्लेखनीय कामगिरी करून ध्येय पूर्ण केलं. अशा या ध्येयवेड्या जिजाऊंच्या लेकीला मनःपूर्वक सलाम, तसेंच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..