नेत्यांच्या बायका प्रचारात

Update: 2019-10-13 12:13 GMT

विधानसभेच्या रणधूमाळीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. यंदाची निवडणूक ही सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक उमेदवारांसह त्यांच्या सौभाग्यवती देखील मोठ्या ताकतीनं प्रचारासाठी सज्ज झाल्या आहेत. सभा, मेळावे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या पतीला विजयी करण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत.

courtesy : social media

परळी मतदार संघातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांमध्ये चुरशीची लढाई होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी काल महिला मेळावा आयोजित केला होता. “एकदा धनंजय मुंडे यांना निवडून द्या, परळीचा चेहरामोहरा बदलू,” अशी भावनिक साद राजश्री मुंडे यांनी घातली. आपल्या पतीला विजयी करण्याचं आवाहन त्यांनी परळीकरांना केले आहे.

सातारा विधानसभा मतदार संघात शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरूद्ध दीपक पवार यांची लढत पहायला मिळणार आहे. शिवेंद्रराजेंनी पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरवात केली आहे. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे देखील प्रचारात सहभागी झाल्या आहेत. सातारा शहरासह जावळी आणि सातारा तालुक्यातील इतर गांवामध्ये जाऊन पदयात्रा कोपरा सभेंच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत.

जलसंपदा मंत्री भाजप नेते गिरीष महाजन यांच्यावर राज्यातील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या जामनेर मतदार संघातील प्रचाराची जबाबदारी मात्र, त्यांच्या पत्नी साधना महाजन सांभाळत आहेत. साधना महाजन या जामनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. गेली २५ वर्षे त्या महाजनांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत. मात्र, यावेळी त्या प्रथमच स्वतंत्रपणे प्रचार करत आहेत. दररोज कार्यकर्त्यांसह आठ गावात जाऊन त्या प्रचार करत असतात.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील प्रचारासाठी सरसावल्या आहेत. नुकताच त्यांनी जळोची येथील काळेश्वर मंदिरात नारळ वाढवून पतीच्या विजयाचं साकडं घातलं. त्यानंतर प्रभाग नं-6 येथून प्रचारार्थ पदयात्रा काढली. यावेळी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्तिथी दाखवली. 'विकासाचा दादा अजितदादा असा नारा या पदयात्रेत लगावला गेला.'

 

Similar News