आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर आली असून राजकीय वर्तुळात अमरावतीच्या अपक्ष उमेदवार नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर या चर्चाना उधाण आला आहे. जर राणा दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो. गेल्या आठवड्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मात्र आता थेट नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अमरावती मतदार संघात त्यांनी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून संसद गाठली . या मतदार संघातून आनंदराव अडसूळ तीन वेळा खासदार राहिले आहेत.