CoronaVirus: डॉक्टरांच्या सुरक्षेचं काय?

Update: 2020-03-23 08:02 GMT

कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात राज्यातील डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि पोलिस यंत्रणा महत्त्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. सर्वसामान्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. दिवसाला हजारो व्यक्तींच्या संपर्कात येणारे डॉक्टरांना पुरेशा सुविधा पुरवल्या जाणं गरजेचं आहे. म्हणूनच डॉ. साधना अमोल पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना वैयक्तीक सुरक्षा साधनांची व्यवस्था करून देण्यासाठी पत्र लिहलं आहे. काय आहेत या पत्रातील सूचना वाचा..

प्रति

मा. राजेश टोपे सर,

आरोग्यमंत्री,महाराष्ट्र शासन,

विषय- कोरोना विषाणू संसर्ग साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व डॉक्टर्सना PPE (personal protection equipments) उपलब्ध करून देणेबाबत...

आदरणीय महोदय,

नोव्हेल कोरोना विषाणू हा अत्यंत संसर्गजन्य आहे.या विषाणूच्या साथीचा प्रसार अत्यंत वेगाने होत असल्याचे इतर देशांमध्ये दिसून आले आहे.

महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळून आल्यापासून, राज्य सरकारचे हा विषाणू पसरू नये यासाठीचे प्रयत्न नक्कीच चांगले आहेत.

कोरोना संशयीत प्रामुख्याने सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहेत,अश्या बऱ्याच सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांना पुरेसे Zकिट, N95मास्क,सॅनिटायझर्स नाहीत असे चित्र आहे.

तसेच ,कोरोनामुळे इतर देशात माजलेला हाहाकार बघूनदेखील अजूनही मानवतावादी दृष्टिकोनातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी हॉस्पिटल्स पूर्ण बंद केलेली नाहीत.

परंतु कोरोनाबाधित असलेले पण सध्या काहीच लक्षण नसलेले हजारो लोक आहेत जे त्यांच्या इतर आजारांसाठी, तक्रारींसाठी डॉक्टरांकडे येत आहेत. इमर्जन्सी रुग्ण आणि त्याबरोबर येणारे त्यांचे नातेवाईक यामुळे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना संसर्गाची खूपच शक्यता आहे, तसेच त्यांना झालेल्या संसर्गातून त्यांचे इतर रुग्ण, कुटुंबीय यांनाही संसर्गाचा प्रचंड धोका आहे. हा धोका काही प्रमाणात तरी कमी व्हावा म्हणून सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि कर्मचारी यांना z किट, N95 मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स, हायपोक्लोराईट सोल्यूशन इत्यादी, कमीतकमी पुढील चार आठवडे पुरेल इतक्या मुबलक प्रमाणात सरकारी यंत्रणेतून त्वरित उपलब्ध करून द्यावे ही विनंती.

तसेच या कठीण काळात डॉक्टरांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्यांसाठीही योग्य ती खबरदारी घेतली जावी ही विनंती

आपली विश्वासू, डॉ साधना अमोल पवार, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ ,पलूस obgysadhana@gmail.com

Similar News