या महिला महाराष्ट्र च्या राजकारणात चर्चिल्या जात आहेत...

Update: 2022-05-20 11:04 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात महिला नेतृत्व तसं फारच कमी पण गेल्या काही काळात ते आपल्याला वाढताना दिसतंय. रूपाली चाकणकर, चित्रा वाघ, दिपाली सय्यद, नवनीत राणा, यशोमती ठाकूर, निलम गोऱ्हे, शालिनी ठाकरे, मनिषा कायंदे या आणि अशा अनेक महिला नेतृत्व गेल्या काही काळात राज्यामध्ये उभं राहिलं आहे. पण यातील काही राजकीय महिला सध्या वादात सापडू लागल्या आहेत. पण वादात सापडायला देखील तेवढा नावलौकीक मिळवावा लागतो आणि नावलौकीक मिळवण्यासाठी तशी कामं करावी लागतात. या महिला देखील अगदी सामान्यांतून वर आलेल्या आहेत अशाच सध्या चर्चेत असलेल्या चार महिला नेतृत्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१.चित्रा वाघ

चित्रा वाघ सध्या भाजपा आहेत. मात्र, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा असल्यापासूनच त्या चर्चेत आहेत. अखिल भारतीय सेनेतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. सतत राज्यभर दौरे करणाऱ्या चित्रा वाघ यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून भाजपात जाणाऱ्या नेत्यांची रीघ लागली होती. त्याच काळात चित्रा वाघ यांनी कमळ हाती घेतलं होतं.

चित्रा वाघ यांनी भाजपाची वाट धरली, तेव्हा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली गेली होती.

हे प्रकरण चर्चेत असताना चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्या नाराज होत्या आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडला असल्याचंही बोललं गेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा", असं शरद पवार म्हणाले होते.

चित्रा वाघ या २० वर्षं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. राष्ट्रवादीत असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर बरीच वर्षं काम केलं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीची सत्ता असताना चित्रा वाघ या राज्य महिला आयोगाच्या सदस्याही होत्या.

भाजपात दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ सक्रिय झाल्या होत्या. विशेषतः भाजपा विरोधी बाकांवर गेल्यापासून त्यांनी महिला अत्याचार आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर त्या सातत्याने सरकारला जाब विचारताना दिसत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असताना चित्रा वाघ थेट सरकारला प्रश्न विचारून कोडींत पकडताना दिसत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावरून रणकंदन सुरू असताना चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांचं लाचलुचपत प्रकरण चर्चेत आलं आहे. एसीबीने किशोर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपण पूजा चव्हाण प्रकरणावरून सरकारला सवाल करत असल्यानं आपल्या पतीला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

२. रूपाली चाकणकर

रुपाली चाकणकर या मूळच्या दौंडमधल्या. रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं. अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही त्यांनी केला. पण त्यात फारसं यश मिळालं नाही. पुढे लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या. रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला.

2002 पासून पुढची 5-6 वर्षं त्यांनी महिला बचतगटासाठी काम केलं. त्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. पुढे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वेभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी रुपाली चाकणकर यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळालं. पण ही निवड करण्याच्या काही दिवस आधीच चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्यानंतर अचानक महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.

रुपाली चाकणकर यांनी तत्कालीन सरकारविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी विविध नेत्यांवर केलेल्या बोचर्याय टीकांमुळे त्या चर्चेत राहील्या. सुरुवातीलाच त्यांनी 'चित्रा वाघ यांनी पळून जाण्याची भूमिका का स्वीकारली?' अशी प्रश्न विचारला होता. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, "मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रूपाली चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. मी त्यावेळी तिच्या पाठीशी उभी राहिले होते. मी राजीनामा दिल्यामुळे ती महिला प्रदेशाध्यक्ष झाली हे तिने विसरू नये."

त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत चित्रा वाघ यांनी टीका केली असता, "ज्यांचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकला आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार," अशी बोचरी टीका चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली होती.

काही दिवसांपूर्वी प्रविण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना चाकणकर यांनी' दरेकर माफी मागा नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू' असा इशारा प्रविण दरेकर यांना दिला होता. अमृता फडणवीस यांनी भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं, "ज्यांच्या गाण्याचा सूरांशी कधी ताळमेळ नसतो तसाच त्यांच्या बोलण्यातही नसतो." धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी केलेले आरोप किंवा पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप असोत याबाबत मात्र रूपाली चाकणकर यांनी मौन बाळगलं. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

३. दिपाली सय्यद

दिपाली सय्यद या आता गेल्या काही वर्षात जरी राजकारणात सध्या सक्रीय दिसत असल्या तरी त्या आधी एक अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. मुंबईच्या कुर्ल्यात जन्मलेल्या दिपाली भोसले यांनी बिहारच्या नालंदा विद्यापिठातून फाइन आर्ट्समध्ये पदवी संपादन केली आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी त्यानंतर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ३० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भुमिका साकारल्या. काही मराठी मालिकांमध्येही कामं केली.


यानंतर २०१४ मध्ये त्यांनी अचानकपणे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश मिळवला आणि राजकारणात उतरल्या. त्याच वर्षी त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. पण त्या निवडणुकीत त्यांना सपशेल पराभव पत्करावा लागला होता. यानंतर त्या फारशा राजकारणात काही सक्रीय दिसल्या नाहीत. २०१९ मध्ये त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कोव्हीडमुळे गप्प असलेल्या दिपाली सय्यद आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्या इतक्या सक्रीय झाल्या आहेत की थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच आव्हान देण्यास सुरूवात केली आहे.

४. नवनीत राणा

नवनीत कौर राणा ही एक माजी भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जिने प्रामुख्याने तेलुगु चित्रपटात काम केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून अमरावतीमधून निवडून आलेले खासदार आहेत. नवनीत कौर राणा खूप चर्चेत आहे.

नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला. नवनीत कौर राणा लबाना जातीतील शीख कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. त्याची आई आणि भावंडांबद्दल फारशी माहिती नाही.

त्यांचे शालेय शिक्षण कार्तिक हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई (दहावी पर्यंत) झाले. 12वी पूर्ण केल्यानंतर कौरने अभ्यास सोडला आणि मॉडेल बनली.

तिच्या चित्रपट कारकिर्दीत थोड्या अंतरानंतर, 3 फेब्रुवारी 2011 रोजी, तिने अमरावती शहरातील बडनेरा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला एक मुलगा रणवीर आहे.

असे वृत्त आहे की त्यांनी एका सामूहिक विवाह सोहळ्यासह गाठ बांधली जेथे नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव यांच्यासह अनेक राजकारणी आणि व्हीआयपी उपस्थित होते.

नवनीतने 6 म्युझिक व्हिडिओमधून मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने 2004 मध्ये "दर्शन" या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, ज्यामध्ये तिने 'नंदिनी' ही भूमिका साकारली होती.

त्याच वर्षी तिने सीनू वासंती लक्ष्मी या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर 'चेतना', 'जगपती', 'गुड बॉय', 'जबिलम्मा' आणि 'भूमा' या तेलुगू चित्रपटांमध्ये ती दिसली.

2009 मध्ये तिने "लव्ह इन सिंगापूर" या मल्याळम चित्रपटात काम केले. कौरने गुरप्रीत घुग्गी सोबत पंजाबी चित्रपट "लड़ गया पेचा" मध्ये काम केले आहे.

नवनीत यांनी 2014 मध्ये अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या निवडणुकीत 1.37 लाख मतांनी पराभूत झाल्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अमरावती मतदारसंघातून त्या खासदार झाल्या.

Tags:    

Similar News