कठुआ सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण; आज लागणार निकाल

Update: 2019-06-10 03:45 GMT

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिच्या हत्याप्रकरणाचा आज विशेष न्यायालयात निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या प्रकरणी पंधरा पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानुसार गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिची हत्या करण्यात आली.

पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेल्या वर्षी जून महिन्यापासून या प्रकरणावर दररोज सुनावणी झाली. गुन्हे शाखेने या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात केली आहे. हेड कॉन्स्टेबल टिळक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आरोप आठपैकी सात आरोपींवर ठेवण्यात आला आहे. न्यायालय काय निर्णय देणार याकडे अख्या देशाचे लक्ष लागले आहे.

Similar News