राष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू जान्हवी मोरेचा टँकरच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी कल्याण-शीळ मार्गावरील लोढा बसस्टॉपवर जात असताना डोंबिवलीकडून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. जान्हवीचा अपघात होण्यापूर्वी टँकरचालक रोहिदास बटुळे याने आधी रिक्षाचालकाला धडक दिली. यातून निसटण्यासाठी तो वेगाने टँकर चालवू लागला दरम्यान टँकरचालकाने पुढे येऊन जान्हवीला धडक दिली. अखेर टँकरचालकाला मानपाडा पोलिसांनी पकडले असून गुन्हा दाखल केला आहे.
जान्हवीने तिच्या खेळाची सुरुवात २०१५ साली राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावून केली होती. जान्हवी बँक ऑफ इंडिया कडून शिष्यवृत्तीवर कॅरम खेळत होती. जान्हवीने नुकतेच जानेवारी २०१९ मध्ये युथच्या कॅरम स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळवले होते आणि अशा प्रकारची अनेक परितोषक जान्हवीने पटकावली होती. लोढा येथील स्मशानभूमीत जान्हवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जान्हवीच्या अपघाती मृत्यूने शोककळा पसरली आहे