करोनाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त आलेल्या अनेकांनी आपापल्या गावांची वाट धरली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेला पुन्हा एकदा एक आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन हे आवाहन केले आहे, “करोनाची लागण होईल या भीतीने अनेक लोक सध्या नोकरीच्या ठिकाणाहून गावी निघाले आहेत. उलट यामुळे गर्दीत प्रवास करणाऱ्यांना करोनाची लागण होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे तुम्ही जिथे जाणार आहात तिथल्या लोकांनाही धोका वाढणार आहे. त्यामुळे तुमचं गाव आणि कुटुंबाला त्रास होईल”.
दुसऱ्या टि्वटमध्ये मोदींनी म्हटलंय की, “ सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ज्या शहरात आहात तिथेच राहा. त्यामुळे करोना व्हायरसचा फैलाव होण्यापासून रोखला जाऊ शकतो. रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकांवर गर्दी करून आपण आपल्या जीवाशीच खेळत आहोत. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नका.”