यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली व त्यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी सरकारला आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी आज लोकप्रतिनिधी म्हणून पुरंदर विभागाच्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली.
सरकारने शेतकर्यांकडे लवकर लक्ष केंद्रित करावे यासाठी पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या पिकांचा आणि फळांचा गुच्छ भेट म्हणून दिला. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्या समजून तात्काळ मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील म्हणाले की, "नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेव्यतिरिक्त किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याची चाचपणी सुरु आहे."
फळबागांच्या नुकसानाचा पंचनामा प्रशासन करत नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली असता यावर पाटील यांनी प्रशासनाला 'माणूस गरीब आहे की श्रीमंत हे महत्वाचे नाही. तर आजारी आहे हे महत्वाचे असते त्याचप्रमाणे शेतकरी फळ पिकवतो की भाजीपाला यापेक्षा त्याचे नुकसान झाले आहे हे अधिक महत्वाचे आहे, असे सांगुन पंचनाम्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांसाठी जमेल ते सगळे करू अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीनंतर तीन तालुक्यांची मिळून बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.