जागावाटपांवर शिक्कामोर्तब होऊन, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. या यादीत वडाळा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून कालिदास कोळंबकर यांचं नाव जाहीर झालं आहे. त्यामुळं माजी महापौर श्रद्धा जाधव यांचं आमदार होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरलं आहे. त्यांनी “मीच आमदार होणार” अशी घोषणा देखील केली आहे.
शिवसेनेच्या माजी महापौर असलेल्या श्रद्धा जाधव यांनी वडाळा मतदार संघ भाजपाला मिळू नये म्हणून खासदार राहुल शेवाळेंसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. हा मतदारसंघ भाजपला देऊ नका अशी विनंती त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना या भेटी दरम्यान केली होती.
वडाळा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेल्यानं स्थानिक शिवसैनिक नाराज असल्याचं बोललं जात आहे. वडाळा मतदार संघात काँग्रेसमधून भाजपात आलेले कालिदास कोळंबकर यांच्याबद्दल स्थानिक शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यामूळे या पार्श्वभुमीवर जाधव यांच्या आमदार होण्याच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, भाजपने कोळंबर यांना उमेदवारी दिल्यानं श्रध्दा यांचं आमदार होण्याचं स्वप्न या निवडणुकी पुरते तरी अपूर्ण राहणार आहे.