वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळे चविष्ट पदार्थ बनवणाऱ्या दिपिका चव्हाण यांची सुगरण म्हणून ओळख होतीच… त्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड त्या आमदार झाल्यानंतरही उत्तमरित्या जोपासतं आहेत. झोडगे येथील सुकलाल भामरे यांच्या त्या कन्या आहेत. दिपिका चव्हाण यांचा विवाह सटाणा येथील राजकीय घराण्यातील माजी आमदार संजय चव्हाण यांच्याशी झाला. दिपिका चव्हाण यांचे सासरे नगरसेवक, तर सासू नगराध्यक्ष होत्या. विवाहाप्रसंगी पती नगराध्यक्ष होते. सुकलाल भामरे यांनी आपली कन्या बहिणीच्या घरी म्हणजे, भाचे माजी आमदार संजय चव्हाण यांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिपिका चव्हाण यांना उमेदवारी देऊन विधानसभा निवडणुकीत विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मालेगावमधील झोडगे येथील माहेरवाशीण असलेल्या आमदार दिपिका चव्हाण बागलाणच्या पहिल्या महिला आमदार आहेत. बागलाण तालुक्यातील प्रथमच महिलेच्या रूपाने दिपिका चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या आमदार झाल्या. दिपिका चव्हाण यांनी खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण करत समाजातील लोकांना विश्वासात घेत विजय मिळवला.
त्यांच्या या गृहिणी ते आमदारकीच्या प्रवासात त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती अर्थात माजी आमदार संजय चव्हाण यांची साथ लाखमोलाची ठरतेय. त्यातच समाजाची, राजकारणाची जबाबदारी जरी त्यांच्यावर आलेली असली तरी घरातल्या जबाबदाऱ्या म्हणजे मुलांचे शिक्षण, स्वयंपाक घर उत्तमरित्या सांभाळत आहे.