राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. दिवसभरात त्यांनी घेतलेल्या भेटी तसेच महत्त्वाचे निर्णय हे जनतेपर्यंत सोशल मीडिया मार्फत शेअर करत असतात. सुळे यांनी आज स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना विनम्र अभिवादन केल्याची पोस्ट केली आहे.
वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार तेथे आले होते. यादरम्यानचे फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांची आज जयंती. कृषी, सहकार, उद्योग अशा सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.” असे सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे.