मला 10 वी ला 77 % गुण पडले होते. गुण तसे चांगलेच होते. कोणताही क्लास नसताना घरातल्या जबाबदाऱ्या माझ्यावर असूनही मी एवढे गुण मिळवले. या यशाचं कौतुक सर्वांनी केलं. त्यामुळं छान वाटलं. पण त्या टक्केवारीचा उपयोग फक्त 11 वीच्या admission साठीच झाला. आज मागे वळून जेव्हा पाहते ना तेव्हा असं वाटतं उगाच मला चांगले गुण मिळाले. कारण एवढे गुण मिळाले नसते तर मी आज मला हव्या त्या आवडीच्या क्षेत्रात काम केलं असतं. चांगल्या टक्केवारीमुळे घराच्यांच्या अपेक्षा वाढल्या त्यामुळे त्यांनी जे ठरवलं तेच करावं लागलं आणि कॉमर्समध्ये प्रवेश घ्यावा लागला. खरं मला खंत वाटते माझ्या दहावीच्या टक्केवारीची कारण एवढे टक्के असतानाही मला ज्या क्षेत्रात शिकण्याची आवड होती ती करता आली नाही. मला दहावीनंतर माझं करिअर चित्रकला आणि स्पोर्ट्स मध्ये करायचे होते आणि ही माझी आवड ही होती. मात्र आज असं वाटतं की त्यावेळी मला कमी गुण पडले असते तर मी माझ्या आवडीला प्राधान्य दिलं असतं आणि माझा आज आनंदीमय असता. असो... नशिबापुढे कोण जातं... एवढं सगळं सांगण्याचा एकच उद्देश की 10चे गुण टक्केवारी आपलं भवितव्य ठरवू शकत नाही त्यामुळं आपल्या आवडीच्या गोष्टी करा... आनंदी रहा आणि खूप यशस्वी व्हा..
वर्षा नळे