कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देणाऱ्या अनेकांच्या कहाण्या समोर येत असताना आता सध्या चर्चेत आली आहे ती पालघर जिल्ह्यातील एक ३ वर्षांची मुलगी. या मुलीने कोरोनावर मात केली आहे.
हे ही वाचा...
- Fact Check: जगातील पहिली कोरोना लस चाचणी केलेल्या महिलेचा मृत्यू?
- CoronaVirus : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा ८ हजार पार, ११८८ रुग्णांवर यशस्वी इलाज
- राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढणार? आज होणार ठाकरे आणि मोदींची चर्चा
डहाणू इथल्या उपजिल्हा रुग्णालयात या 3 वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू होते. डहाणू तालुक्यातील दसरा पाडा गंजाड इथं राहणाऱ्या या मुलीला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मुलीचे ७ व्या, १३ व्या आणि १४ व्या दिवशी घेण्यात आलेले स्वॅबचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तिला रविवारी घरी सोडण्यात आले.
यावेळी तिला निरोप देण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेंगणे, गटविकास अधिकारी भरक्षे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप गाढेकर हे उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात तिला डिस्चार्ज देण्यात आला. पालघर जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणारी ही मुलगी पहिलीच रुग्ण ठरली आहे.
दरम्यान, या चिमुकलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील २२४ जणांपैकी ७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पालघर तालुक्यातील संपर्कात आलेल्या सर्व २८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.