#माझं_दहावीचं_वर्ष

Update: 2019-06-13 07:13 GMT

क्रिकेटवेडं असल्यानं अनेकदा शाळा बुडवली, ऐन परीक्षेच्या वेळेसही फक्त बैल घाण्याला जुंपावा तसा अभ्यास केला नाही, त्यामुळे घरच्यांचा मारही खाल्ला. अशात इंग्रजी आणि गणिताशी 36 चा आकडा असल्याने अगदी काठावर पास होईल ही आशा होती आणि झालेलंही तसेच. दोन्ही विषयात काठावर आणि इतर विषयात चांगले मार्क मिळाले आणि कसाबसा फर्स्टक्लास आलो. पण आर्थिक परिस्थिती त्या वेळी एवढी ढासळली होती की एक वर्ष गॅप घेऊन, काम करून शिक्षण घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. संघर्ष हा तर पाचवीला पुजलेला होता, त्यामुळे नेहमीप्रमाणे त्याला कस्पटासमान उडवून लावायला नवीन काही करायची आवश्यकता नव्हती. अशा वेळी घरच्यांनी देखील साथ दिली आणि 1 वर्ष गॅप घेऊन 11 वी प्रवेश घेतला.

10 वी चे कमी मार्क, 1 वर्ष गॅप, आपल्यातील पोरं एक पाऊल पुढे गेल्याचे दडपण झुगारून अभ्यासाला लागलो आणि 12 वी, बीकॉम आणि मास्टरला कॉलेजमध्ये पहिल्या पाचात आलो. आणि आज मुंबईत चांगला जॉब करतोय. त्यामुळे कमी मार्क मिळाले, हा माझ्या पुढे गेला यांच्यात अडकून न पडता स्वतःला ओळखा, चुका सुधारा, रस्त्यात काटे आले म्हणून तो बदलू नका तर काट्याला बाजूला सारून रस्ता बनवा आणि जगाला आपली ओळख करून द्या, दखल ही घ्यावीच लागणार.

गणेश पुराणिक , पत्रकार, सामना

(असेचं तुमचेही दहावीचे अनुभव शेअर करा आणि #माझं_दहावीचं_वर्ष #maxwoman हे हॅशटॅग तुमच्या पोस्टला वापरा)

Similar News