पुण्यात शिक्षण घेत असलेल्या पूजा झोळे ही तरूणी गड किल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असते. यावेळी तिने राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शवत सिंहगड किल्ल्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करुन त्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.
'ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूला आणि वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा दिली जायची. त्याप्रमाणे आज या सिंहगडाच्या कड्यावरून मी तुमच्या या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करतेय,' असं सांगत पुजाने हातातील पुतळा खाली फेकून दिल्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला.
मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा कडेलोट करतानाचा तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. याच जोडीला 2016 मध्ये शिवराज्यभिषेक सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी, ‘माझ्याकडून काही चूक झाल्यास माझा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा,’ असे वक्तव्य केलेला व्हिडिओ देखील गड प्रेमींनी व्हायरल केला आहे.