Fact Check | जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं लॉकडाऊनचे तारखेनुसार चार टप्पे? | हे आहे सत्य
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. २२ मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशातील नागरिक २१ दिवसांसाठी आपापल्या घरात आहेत.
१४ एप्रिलपर्यंत ही लॉकडाऊनची स्थिती कायम राहणार आहे. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन शिथिल होणार की आणखी वाढणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच सोशल मीडियावरही लॉकडाऊनसंदर्भात एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं लॉकडाऊनसाठी वेळापत्रक तयार केलंय असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोस्टमध्ये लॉकडाऊनचे तारखेनुसार चार टप्पे सांगितले आहेत. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर १५ ते १९ एप्रिलदरम्यान शिथिल केला जाईल. २० एप्रिल ते १८ मे असा २८ दिवसांचा लॉकडाऊन पुढच्या टप्प्यात केला जाईल. यानंतर देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता पुढील लॉकडाऊन निश्चित केलं जाईल असं या पोस्टमध्ये म्हटलंय.
WHO PROTOCOL & PROCEDURE OF LOCKDOWN PERIODS pic.twitter.com/sGcfuEfFZD
— MLA CRUZ (@lawrence8836237) April 5, 2020
तथ्य पडताळणी :
लॉकडाऊनच्या तारखांसंदर्भात हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर मॅक्सवूमन'ने याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल केलं जाईल किंवा वाढवलं जाईल याबाबत शासकीय पातळीवर कोणतीही घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हे ही वाचा
Fact Check: अवकाशातून दिवे लागलेला भारत खरचं असा दिसतो?
यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व विभागानेही याबाबत खुलासा केला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल असलेली माहिती पूर्णपणे खोटी असून जागतिक आरोग्य संघटनेनं लॉकडाऊनसंदर्भात कसलंही वेळापत्रक तयार केलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
https://twitter.com/WHOSEARO/status/1246804406705614848?s=19
निष्कर्ष :
जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातील लॉकडाऊनसंदर्भात कोणतंही वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. याशिवाय भारत सरकारकडूनही अशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे खोटी आहे.
'मॅक्सवूमन'चे आवाहन :
देशात कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट्स व्हायरल होत आहेत. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करणे, मेसेज फॉरवर्ड करणे हा गुन्हा ठरू शकतो. याशिवाय कोरोनविषयी चुकीची माहिती फॉरवर्ड केल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आलेल्या कोणतीही माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. माहिती पोस्ट आणि फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहा. 'फेक न्यूज'चे बळी ठरू नका आणि 'फेक न्यूज' पसरवू नका.