कोरोना या महाभयंकर व्हायरसने जैविक महामारीचे भयावह संकट उभे केले आहे. संपूर्ण जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाचा दिवसागणीक वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी यंत्रणा ताकतीने काम करताना दिसत आहेत. हे युद्ध जिंकण्यासाठी अगदी ग्राम पातळीवरील अंगणवाडी सेविका, आशाताई या महीला देखील दारोदारी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करत घरातच राहण्याचे आवाहन प्रत्येकाला करत आहेत.
याच कामाचा वसा घेतलेल्या नंदिनी दिवेकर या अंगणवाडी सेविका स्वतः गरोदर असून नववा महीना भरलेला असतानाही आपल्या वेदना बाजूला ठेवून जनजागृतीसाठी झटत असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथील एका मोहल्ल्यामध्ये त्या कोरोना व्हायरस संदर्भात माहिती देऊन काळजी घेण्याच्या सुचना देत असतानाच अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या त्याच वेळी सोबतच्या अंगणवाडी सेविकेने त्यांना तात्काळ बोर्ली प्राथमिक आरोग्य केंदामध्ये दाखल केले व तीथे सुखरूपपणे त्यांची प्रसूती झाली.
नंदिनी आणि त्यांचे बाळ दोघेही सुखरूप आहेत. जीवाची बाजी पणाला लावत कोरोना व्हायरस सारख्या विषाणूला रोखण्यासाठी नंदिनी सारख्या जिगरबाज महीला पुढे सरसावल्या आहेत. किमान याचा तरी विचार संचारबंदीचा फज्जा उडवू पहाणाऱ्यांनी करावा एवढीच माफक अपेक्षा.
नंदिनी प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर लोकांना एकच सांगतेय, ‘बाबांनो घरात बसा, स्वतःचा व कुटुंबाचा जीव सांभाळा. शासन व प्रशासनाला सहकार्य करा’